राज्यात सध्या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी ठाण्यात घेतलेल्या उत्तरसभेत शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यातच आता धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख अर्धवटरावर असा उल्लेख केला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी परीसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली. दरम्यान त्यांच्या या टीकेला मनसेनेही उत्तर दिलं आहे.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

“पूर्वी रामदास पाध्ये यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपाच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपाविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले,” असं म्हणत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे हे भाजपाचे भोंगे म्हणून काम करत असल्याचं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. भाजपच्या इतक्या सीडी लावल्या की त्यांच्यामागे ईडी लागली असाही टोला त्यांनी लगावला. तसंच माणसं सत्तेत आल्यानंतर किती माजतात हे आपण मागच्या पाच वर्षात पाहिलं अशी टीक त्यांनी भाजपावर केली.

मनसेकडून प्रत्युत्तर –

धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंना अर्धवटरावर म्हटल्यानंतर मनेसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे. लवकरच तुमचा थरथराट होणार. Get Well Soon धनंजय मुंडे”.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी या सभेत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक दिवस मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे १०० आमदार निवडून आणण्याचं जयंत पाटील यांचं स्वप्न असून तेदेखील पूर्ण होणार असंही ते म्हणाले.

Story img Loader