MNS 17th Anniversary Thane Updates: मनसेच्या १७व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात राज्यात सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडींवर सूचक शब्दांत भाष्य केलं. येत्या २२ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेमध्ये राज ठाकरे सविस्तर भूमिका मांडणार आहेत. मात्र, आज केलेल्या भाषणात त्यांनी राजकीय मंडळींवर चांगलीच टोलेबाजी केली. दरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
“तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं?”
“पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर काढण्याचं काम मनसेनं केलं. तेव्हा बाकीचे हिंदुत्ववादी लोक कुठे होते? काय करत होते? चिंतन! बाकीचे म्हणतात आम्ही हिंदुत्वाला मानतो, म्हणजे काय करता? तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय असतं? नुसती जपमाळ? प्रत्यक्ष कृतीत तर कधी दिसत नाही ते. भोंग्यांच्या प्रकरणानंतर मला अयोध्येला बोलवलं. विरोध करणारे हिंदुत्ववादीच. मला आतलं राजकारण कळलं होतं. म्हणून मी म्हटलं तूर्तास नको, आत्ता हे राजकारण नको”, असं राज ठाकरे म्हणाले.
“ज्यांनी तेव्हा अयोध्या दौऱ्याला विरोध केला, त्यांचं काय झालं? असंच असतं. म्हणून आपल्या वाट्याला जायचं नाही कुणी. भोंग्याच्या प्रकरणात महाराष्ट्रभर १७ हजार केसेस दाखल झाल्या. मी म्हणालो ना, वाट्याला जायचं नाही. मुख्यमंत्रीपदावरून जावं लागलं”, असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता लगावला.
“निवडणुका लागतील, तेव्हा आपण सत्तेत असणार”
“जनता सध्याच्या राजकीय तमाशांना विटलेली आहे. आपण फक्त त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा महानगर पालिका निवडणुका लागतील, तेव्हा मनसे सत्तेर असणार म्हणजे असणार”, असा विश्वास राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.
“इंदू मिलमध्ये इतकी मोठी वास्तू उभी राहिली पाहिजे, ग्रंथालय उभं राहिलं पाहिजे की आख्खं जग तिथे ज्ञान मिळवायला बाबासाहेबांच्या चरणी आलं पाहिजे. पुतळे उभे करून हाती काही लागत नाही. जयंती आणि पुण्यतिथ्या यापलीकडे आपल्या हाती काही लागणार नाही. ते काय म्हणून गेले याचं आत्मचिंतन आपण करणार नसू, तर खरं सांगतो, महाराष्ट्राचं काही खरं नाही. आता जे काही चालू आहे, ते महाराष्ट्राला खड्ड्यात नेणारं आहे. असा महाराष्ट्र मी कधीही पाहिला नव्हता. इतकं गलिच्छ, घाण राजकारण, इतकी खालच्या थराची भाषा कधी आजपर्यंत पाहिली नाही”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.