नवाब मलिक प्रकरणावरुन महायुती सरकारची कोंडी झाली आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असताना ते सत्ताधारी बाकांवर कसे काय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. तसंच नवाब मलिक यांचं उदाहरण देताना प्रफुल्ल पटेल यांचे इक्बाल मिर्चीशी व्यवहार झाल्याचा आरोप भाजपानेच केला होता. त्यांच्याविषयी कुणी काहीच का बोलत नाही? असाही प्रश्न विरोधकांनी विचारला आहे. यामध्ये आता मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेने एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट लिहित सरकारला खोचक प्रश्न विचारत टोला लगावला आहे.
काय आहे मनसेचा टोला?
हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची ‘मिर्ची’ टाकणं महायुतीच्या ‘प्रफुल्लित’ कार्यकर्त्यांना ‘पटेल’ ? आणि हो, ‘नवाब’चाही ‘जवाब’ ‘पटेल’ असाच द्या. अशी पोस्ट मनसेने केली आहे. याला सत्ताधाऱ्यांकडून आणि खासकरुन भाजपाकडून काही उत्तर दिलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे गुरुवारी (७ डिसेंबर) आणि शुक्रवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. दोन्ही दिवस मलिक हे विधीमंडळाच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असं स्पष्ट केलं. दरम्यान, फडणवीसांच्या पत्राला ढोंग म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
मलिकांबरोबरच प्रफुल्ल पटेल यांच्या इक्बाल मिर्चीबरोबरच्या संबंधांबाबतचा मुद्दा काँग्रेस व अन्य विरोधकांनी उपस्थित केल्याने फडणवीस व भाजपची कोंडी झाली आहे. पटेल यांचे दाऊदचा सहकारी मिर्चीशी संबंध असून वरळीतील सीजे हाऊस या मालमत्तेच्या विकासावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २१ जुलै २०२२ रोजी कारवाई करून अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमतेच्या व्यवहाराच्या बदल्यात पटेल यांनी मिर्चीच्या निकटवर्तीय व नातेवाईकांना २२ कोटी रुपये, सात सदनिका दिल्याचा आरोप आहे. ईडीने पटेल यांच्या सदनिका, एक चित्रपटगृह, हॉटेल, पाचगणी येथे एक हॉटेल, दोन बंगले आणि साडेतीन एकर जमीन एवढ्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
पटेल यांचे मिर्चीशी असलेल्या संबंधांवरून फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईनंतर आणि आधीही अनेकदा आरोप केले आहेत. मलिक यांच्यावर देशद्रोही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप फडणवीस यांनी केले, तेव्हाही पटेल व मिर्ची आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटेल यांच्याविरोधात मोर्चा काढून निदर्शनेही केली होती. हे सगळे मुद्दे आता विरोधक उचलून धरत आहेत. तर आता मनसेनेही खोचक पोस्ट लिहित सरकारला सवाल केला आहे.