इचलकरंजी येथे थकीत वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडीत केल्याचा जाब विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. यामध्ये कॅशियर जखमी झाला असून अचानकपणे झालेल्या आंदोलनाने अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्य दरवाज्यासह खिडक्या आणि कॅश काऊंटरवर हल्ला करुन काचा फोडण्यात आल्याने कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडून काही जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दरम्यान, या घटनेचा निषेध नोंदवत महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना महामारीमुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने छेडत करोना काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी केली जात आहे. बिलमाफी मिळेल या आशेवर अनेकांनी जवळपास वर्षभर बिलेच भरलेली नाहीत. त्यामुळे आता महावितरण कंपनीकडून पोलिस बंदोबस्तात वसुली सुरू आहे.

या वसुली मोहिमेअंतर्गतच लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील मनसेच्या एका पदाधिकार्‍याचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्याचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी मनसेचे काही कार्यकर्ते स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक वाद झाला. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयावरच हल्लाबोल करत कंपनीच्या मुख्यप्रवेशद्वारासह खिडक्या आणि कॅश काऊंटरसमोरील काचा फोडण्यास सुरुवात केली.

कार्यालयात काचा आणि विटांचा खच पडला होता. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेण्यासह हल्ल्यातील लोखंडी पाईप, खोरे, विटा, दगड आदी साहित् जप्त केले. मोठ्या प्रमाणात फौजफाटा दाखल झाल्यामुळे महावितरण कार्यालयास छावणीचे स्वरूप आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns attack mseb office over high electricity bill issue scsg