MNS Avinash Jadhav On Sanjay Raut : भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांची आगमी महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यतेच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. यादरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या मनसेचा वापर केला जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्यांच्या या विधानानंतर आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी होतो आहे असं म्हटलं आहे. यावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, “शिवसेना संपवण्याचं महाराष्ट्रात सगळ्यात मोठं पाप जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊत यांनी केलं आहे. २०१९ साली ज्या पद्धतीने अभद्र युती त्या माणसाने केली आणि काँग्रेसबरोबर गेले त्या दिवसापासून शिवसेनेची उतरती कळा सुरू झाली होती”.
“बाळासाहेबांचा पक्ष आणि मराठी माणसाची लाज काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं आहे. त्यामुळे मनेसचा विचार संजय राऊतांनी करू नये. आम्ही पुन्हा उभे राहू, पुन्हा आमच्या ताकतीवर उभे राहू. बाळासाहेबांना देखील उभं राहायाल ३७ वर्ष लागली होती. त्यामुळे आम्हाला काही घाई नाही. संजय राऊतांना सत्तेत बसण्याची, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता बसवण्याची घाई असते, त्यामुळे संजय राऊत हे शिवसेना पक्ष घेऊन डुबतील एवढं नक्की”, असेही अविनाश जाधव म्हणाले.
हेही वाचा>> Sanjay Raut : “बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर”; संजय राऊत यांचा गंभीर दावा
संजय राऊत काय म्हणाले होते?
भाजपा आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी विधान केलं होतं की, “मनसेचा वापर होतो आहे, तो वापर कुणाविरुद्ध होतो आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात होतो आहे. हा वापर मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी होतो आहे एवढंच मी सांगेन.” दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या संपूर्ण चर्चेबद्दल काय मत व्यक्त करतात हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.