गुढीपाडव्याच्या सभेतील भाषणानंतर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा घेण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. ही सभा गडकरी रंगायतन नाटय़गृहाजवळील मूस चौकात घेण्यास परवानगी देण्याची मागणी मनसेने पोलिसांकडे केली असली तरी नाटय़गृहामधील नियोजित कवी संमेलनाच्या कार्यक्रमामुळे पोलिसांनी सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही.
दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर गडकरी रंगायतन येथे सभेच्या जागेची पाहणी करण्यात ठाण्यात आले होते. बाळा नांदगावकर यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर जागेची पाहणी केली.
दरम्यान यावेळी बाळा नांदगावकर यांनी ठाण्यामध्ये सभेसाठी मोकळं मैदान नसल्याने सभाही रस्त्यावरच घ्यावी लागणार असा इशारा दिला आहे. रस्त्यावर परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावरच टेबल टाकून राज ठाकरे यांची सभा घेणार असंही यावेळी ते म्हणाले आहेत.
दरम्यान राज ठाकरे यांची सभा तीन पेट्रोल पंपजवळील गजानन महाराज चौक येथे होण्याची शक्यता आहे. मनसेलाही हा पर्याय मान्य आहे. परंतु पोलीस विभाग चाचपणी करून पुढील निर्णय घेणार आहे.
गडकरी रंगायतन येथे काव्य संमेलन तसंच आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नवरात्रौत्सव आयोजित आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच सर्वसामान्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गजानन महाराज चौक हा पर्याय मनसेने सुचवला होता.
“पोलीस आयुक्तांशी आमची चर्चा झाली आहे. रस्त्यांची पाहणी करून योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
प्रत्युत्तर देण्यासाठी ही सभा – नितीन सरदेसाई
मनसेचे नेते नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे, जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर टीका होत असून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ही सभा ठेवण्यात आली असल्याचं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.
मला राज ठाकरेंनी बोलवलेलं नाही – वसंत मोरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या जाहीर सभेत अनेक मुद्यांना हात घालत, राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. पण त्या जाहीर सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास तिथे स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावू असे विधान केले होते. या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. त्याच दरम्यान पुण्यातील दोन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
दुसरीकडे मनसे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर या दोघांच्या प्रभागात जवळपास ७० टक्के मुस्लिम मतदार आहेत.त्यामुळे नेहमी आपली आक्रमक भूमिका मांडणारे दोन्ही नेते द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. मागील सात दिवसांपासून अनेक चर्चा सुरू असताना आज सकाळी चर्चा सुरू झाली की,वसंत मोरे यांना राज ठाकरे यांनी मुंबईत भेटण्यासाठी बोलवले आहे. त्यावर वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मला राज ठाकरेंनी बोलावलं नाही. मनसे नेते अनिल शिदोरे, नेते बाबू वागसकर आणि पुणे महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांना बोलावले आहे. या तीन नेत्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. पण कोणत्या प्रश्नावर चर्चा होणार आहे हे मला तरी माहिती नाही. तसंच मला ठाण्याच्या सभेला येण्याचा निरोप आहे. मी त्या सभेला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.