शिवसेना पक्षाला राम राम करत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत खेड येथे मनसेत प्रवेश केल्याने सिंधुदुर्ग, कोकण व मुंबईत मनसेला पक्ष बांधणीस बळ मिळेल. खरेतर परशुराम उपरकर हे राज ठाकरे यांच्या विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष होते, पण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच निष्ठा ठेवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शिवसेनेची एकेकाळची ताकद मुंबई व सिंधुदुर्ग अशी सांगड घालत चालत होती, पण नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांचे डावे म्हणून ओळखले जाणारे परशुराम उपरकर शिवसेनेतच थांबले. राज ठाकरे यांचे समर्थक असणारे उपरकर मनसे स्थापना होऊनही शिवसेनेतच थांबले होते.
शिवसेनेत नारायण राणे व राज ठाकरे असताना या दोघांच्या जवळ वावरणारा विश्वासू सहकारी म्हणून परशुराम उपरकर ओळखले जायचे, पण त्यांनी शिवसेनाप्रमुखांवरच प्रेम दाखवत शिवसेना सोडली नव्हती. खरेतर शिवसेनाप्रमुखांनी नारायण राणे यांनी शिवसेनेला धक्का देताच परशुराम उपरकर यांना विधान परिषद आमदारकी देऊन शिवसेनेला सावरण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना आणि कोकण हे अतुट नाते होय. उभ्या कोकणाने मुंबईत शिवसेनेला गिरणी कामगार संपापासून साथ दिली. त्यात सिंधुदुर्गचा वरचा क्रमांक होता. शिवसेनाप्रमुखांच्या परिस स्पर्शाने दोन नंबरवाल्यांपासून चार बुके शिक्षणही घेऊ शकले नाहीत, अशांना मान सन्मान मिळवून दिला. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील अनेक जण मुंबईत लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादानेच मिरवत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जवळचा म्हणून परशुराम उपरकर यांची असणारी ओळख त्यांनी शिवसेनेत असताना समोर आणली नाही. पण शिवसेनेत सध्या मिळू लागलेल्या वागणुकीनंतर त्यांना ओळखीची संधी मिळाली.
शिवसेना सचिव आमदार विनायक राऊत हे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील मालवणचे सुपुत्र आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या अखेरच्या टप्प्यात परशुराम उपरकरला डावलून त्यांनी आमदारकी मिळविली आणि त्यांचा सिंधुदुर्गच्या राजकारणात प्रवेश झाला. आमदार राऊत यांच्या प्रवेशामुळे परशुराम उपरकर यांचे संघटनेत खच्चीकरण सुरू झाले. नवा माणूस नवीन संघटनामुळे उपरकर यांचे मन दुखावले गेले. त्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या कानावर आ. विनायक राऊत व सहकाऱ्यांचे प्रताप कानावर घालूनही त्यांनी दखल घेण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी दिलसे मनसेत प्रवेश केला, असे त्यांनी बोलताना सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, नारायण राणे, राज ठाकरे यांच्या अवतीभोवती वावरणारे परशुराम उपरकर हे अभ्यासू म्हणून ओळखले जातात, त्यांनी आमदारकीच्या सहा वर्षांत अभ्यासूपणा दाखवून देत कोकणचे अनेक प्रश्न विधिमंडळात मांडले. अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला.
नारायण राणे यांच्यासमोर शिवसेनेचा झेंडा घेऊन ताठ मानेने उभ्या राहिलेल्या परशुराम उपरकर यांच्या शिवसेनेला राम राम करण्यामुळे सेनेच्या ताकदीवर परिणाम होऊन मनसेची ताकद वाढणार आहे. मनसेला अभ्यासू नेत्याची सिंधुदुर्ग-कोकणात गरज होती ती परशुराम उपरकर यांच्यामुळे पूर्ण होईल.
आमदार विनायक राऊत सिंधुदुर्गात शिवसेना वाढविण्यासाठी महिन्यातून एक किंवा दोन दिवस देत आहेत. त्यामुळे शिवसेनेला बळकटी मिळण्याची शक्यता कमीच आहे. शिवसेनेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचारांचे नेतृत्व नसल्याने तो फटका शिवसेनेला निश्चितच बसणार आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मैत्री जगजाहीर होती, पण राज ठाकरे यांनी राणे यांना डिवचले असल्याने परशुराम उपरकर यांना नारायण राणे यांना यापुढे जशास तसे उत्तर देत मनसेची बांधणी करावी लागणार आहे. येता काळ परशुराम उपरकर यांच्या पक्ष बांधणीचे उत्तर देईल.
परशुराम उपरकर यांच्या राजकारण व प्रशासनातील अनुभवामुळे आणि त्यांच्या उठाठेवी स्वभावामुळे नारायण राणे यांच्या प्रशासनाला धडक देतील, असे त्यांनी सूत्रे हाती घेतल्यावर सुतोवाच केले आहे. परशुराम उपरकर यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे तो ते कसा पेलवतात हे पाहावे लागेल.
उपरकरांच्या प्रवेशाने मनसेला बळ
शिवसेना पक्षाला राम राम करत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत खेड येथे मनसेत प्रवेश केल्याने सिंधुदुर्ग, कोकण व मुंबईत मनसेला पक्ष बांधणीस बळ मिळेल.
First published on: 28-02-2013 at 03:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns become strong because of uperkar