नगरसेवकांची फोडाफोडी करुन शिवसेनेने गलिच्छ राजकारण केले. मी हे कधीच विसरणार नाही. उद्धव ठाकरेंच्या याच घाणेरड्या राजकारणामुळे मी शिवसेना सोडली होती. बाळासाहेबांनी फोडाफोडीचं राजकारण कधीच शिकवलं नाही. जनतेशी प्रतारणा करणारे राजकारण मी करत नाही, आता हातावर नव्हे गालावर टाळी देणार, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.  फोडाफोडीसाठी ३० कोटी रुपये कुठून आणले असा सवालही त्यांनी विचारला.

मुंबईतील मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेने गलिच्छ राजकारण केले असून यामुळे राज्यातील जनतेमध्ये राग आहे. चूक लक्षात आल्याने शिवसेनेने आता अफवा पसरवली. मात्र आम्ही आमचे नगरसेवक शिवसेनेत पाठवले नाहीत. आम्हाला पाठवायचे असते तर सातही नगरसेवक पाठवले असते. या अफवांमध्ये तथ्य नाही, नगरसेवकांनी शिवसेनेत जाण्यामागे आमचा हात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

फोडाफोडीचे राजकारण करुन शिवसेनेने मराठी माणसाचा विश्वासघात केला. त्यांना मराठी माणसाशी घेणंदेणं नाही अशी टीका त्यांनी केली. शिवसेनेने पाच- पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले. म्हणजेच हा व्यवहार सुमारे ३० कोटींचा आहे. मग एवढे पैसे सेनेकडे कुठून आले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मला दीड महिन्यांपूर्वीच नगरसेवकांविषयी कुणकुण लागली होती. मी स्वतःच त्यांची बैठक घेतली, त्यावेळी अनेकांनी पक्षातच राहू असे सांगितले. स्वतःला बाजारात विकायला ठेवणाऱ्यांवर काय बोलणार असेही त्यांनी सांगितले. बाळासाहेबांनी जे राजकारण शिकवले ते मी आत्मसात केले. माझ्यामते राजकारण हे उमदं असायला पाहिजे. इतर पक्ष काय करतात तो वेगळा विषय आहे, पण मला शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात सेनेला टाळी देणार का? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेने एकदा आमच्याशी चर्चा केली असती तर आम्ही मदत केली असती. आता यापुढे हातावर नव्हे तर गालावर टाळी देणार असा सूचक इशाराच त्यांनी दिला.

मी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर पक्षस्थापन करण्याचा विचार केला नव्हता. मी ज्यावेळी पक्षस्थापन केला तेव्हा शिवसेनेसह विविध राजकीय पक्षांमधील नेते माझ्या पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक होते, मात्र मी त्यांना प्रवेश दिला नव्हता, अशी आठवणही त्यांनी करुन दिली.

Story img Loader