मराठी असल्याने मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना जागा नाकारल्याच्या घटनेचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, तृप्ती देवरुखकर यांनी गुरुवारी मध्यरात्री मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतर या दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
या सर्व घडामोडीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत मराठी अस्मितेला हात घातला आहे. मराठी अस्मिता कशी ठिगळं लावलेली आहे, हे व्यंगचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरेंनी व्यंगचित्रात तमिळ, पंजाबी, गुजराती, बंगाली अस्मिता दर्शवणाऱ्या महिलांचं चित्र रेखाटलं आहे. तर मराठी अस्मिता दर्शवणारी महिला मात्र ठिगळं जोडलेली साडी नेसल्याचं दाखवलं आहे. मराठी अस्मिता ब्राह्मण, आगरी, माळी, मराठा, दलित, मातंग, वंजारी आणि इतर जातींमध्ये कशी विभागली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला आहे.
राज ठाकरेंचं व्यंगचित्र ‘एक्स’वर (ट्विटर) शेअर करत मनसेनं म्हटलं की, राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं. आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे, पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. #मराठीमाणूस