लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. कोणत्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आपापल्या पद्धतीने या निवडणुकीची तयारी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) शिवसेना (शिंदे गट), भाजपा या पक्षांशी जवळीक वाढली आहे. याच कारणामुळे मनसेचा महायुतीत समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
“…म्हणजे युती झाली असं नसतं”
गेल्या काही दिवसांपासून मनेसे आणि महायुतीतील नेते एका व्यासपीठावर दिसले आहेत. आगामी काळात मनसेचा महायुतीत समावेश होणार का? असा प्रश्न राज ठाकरे यांना करण्यात आला. यावर बोलताना “एखाद्या नेत्याला अन्य पक्षाच्या नेत्यासोबत व्यासपीठावर एकत्र पाहिलं म्हणजे युती झाली असं नसतं. व्यासपीठावर दोन नेते एकत्र येण्याने युती होत नसते,” असे राज ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तयारी
मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. कोणकोणत्या मतदारसंघातून उमेदवार उभे करायचे, याची या पक्षाकडून चाचपणी केली जातेय. त्यासाठी राज ठाकरे राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांशी बैठका घेत आहेत. यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं, “येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आमच्या मुंबईत तीन ते चार बैठका झाल्या आहेत. आता आम्ही शाखाध्यक्षांसोबत बैठका घेत आहोत. मुंबई, ठाणे येथील शाखाध्यक्षांसोबत आमच्या बैठका झाल्या आहेत. आगामी काळातही या बैठका होणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी या लोकसभा मतदारसंघांसाठी आम्ही बैठका घेत आहोत. आमची चाचपणी चालू आहे,” असेही राज ठाकरेंनी सांगितले.
मनसेचा महायुतीत समावेश होणार का?
दरम्यान, राज ठाकरे महायुतीत सामील होण्याच्या शक्यतेवर आपल्या नेत्यांशी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेते अनेकवेळा एका मंचावर दिसलेले आहेत. या नेत्यांतील जवळीक वाढलेली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसेचा महायुतीत समावेश होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.