झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीकडून कारवाई केली जात आहे. तसेच महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि इतर राज्यात विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणा लागलेल्या आहेत. हे राजकारण पुढे जाऊन सध्याचे सत्ताधारी असलेल्या भाजपाला परवडणार नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना राज ठाकरे यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य केले. “देशभरात केंद्रीय तपास यंत्रणाकडून ज्या कारवाया सुरू आहेत. ते पाहता हे राजकारण भविष्यात भाजपाला परवडणार नाही, असे दिसते. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नसतं. उद्या जेव्हा सत्ताबदल होईल, तेव्हा पलीकडच्या बाजूनेही दामदुपटीने कारवाई होईल, तेव्हा काय कराल?”, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. “इंदिरा गांधींच्या काळातही असंच झालं होतं, पण त्या काळात झालं म्हणून आपणही तेच करायचं, हे योग्य नाही”, असेही स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिले.

‘जरांगे पाटील फसले की फसवले गेले?’, राजकीय अजेंड्याबाबत राज ठाकरे स्पष्टच म्हणाले…

टोलचा पैसा कुणाच्या खिशात जातो

नाशिक येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी टोलनाक्याच्या बाबतीत पुन्हा एकदा भूमिका मांडली. ते म्हणाले, माझा टोलला विरोध नाही. पण टोलवर जी रोकड जमा होते, त्याला विरोध आहे. टोलमधून किती गाड्या गेल्या, किती टोल वसूल झाला, त्यातून सरकारला किती पैसा गेला आणि कंत्राटदाराच्या खिशात किती पैसे गेले? याच्यात कोणतीही पारदर्शकता नाही. जगभरात टोल आहे. पण आपल्याकडे विषय टोलवसुलीचा आहे. मुंबई-पुणे महामार्गावर गेले कित्येक वर्ष टोल वसूल केला जात आहे, या वर्षात अद्याप पैसे वसूल झाले की नाही? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘यावेळी पंतप्रधान कोण व्हावा?’, मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले…

टोलवरील पैसा हा कंत्राटदाराच्या खिशात जातो. तिथून तो राजकीय पक्षांच्या फंडात जातो, अशा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. मलाही कंत्राटदारांकडून ऑफर आल्या होत्या. पण मी त्या स्वीकारल्या नाहीत.

गोडसे, गांधी गेले.. आताच्या प्रश्नावर बोला

रणजीत सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत केलेल्या वक्तव्याचा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला असता त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “जुन्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहीजेत. कुणीतरी गोडसेवर बोलायचं, मग पलीकडून नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर बोललं जाणार. त्यापेक्षा कामावर लक्ष दिलं पाहीजे. गोडसेही गेले, गांधीही गेले.. त्यांच्यावर आज बोलून उपयोग नाही. महागाई, पेट्रोल-डिझेलच्या सेसवर कुणी बोलायला तयार नाही, महाराष्ट्रातच मराठी माणसाला घर नाकारले जाते, त्यावर कुणाला बोलायला वेळ नाही. मग गेलेल्या माणसावर बोलून काय हाती लागणार आहे? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray comment on ed action on opposition leaders kvg
Show comments