ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ९६ व्या वर्षी निधन झालं आणि अवघ्या जगातून हळहळ व्यक्त झाली. राणी एलिझाबेथ या दुसऱ्या महायुद्धापासून ते २१व्या शतकाचे वारे जगात वाहायला लागेपर्यंतच्या इतिहासाच्या एकमेव साक्षीदार होत्या. त्यांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून व्यक्त होत आहे. सर्वच स्तरातून राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरेंनी या पोस्टमधून राणी एलिझाबेथ यांच्या जीवनपटावर संक्षेपात प्रकाश टाकला आहे. तसेच, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी, त्यांनी लीलया पेललेली आव्हाने, फक्त ब्रिटनच नव्हे, तर जगाच्या इतिहासात त्यांचं असलेलं महत्त्व, राजघराण्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असताना त्यांनी दाखवलेला संयम अशा अनेक मुद्द्यांना राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये हात घातला आहे.

राणी एलिझाबेथ आणि जगाच्या इतिहासाची ७० वर्ष!

“ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ यांच्यामुळे”, असं राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

विश्लेषण : राणी एलिझाबेथ कालवश… पुढे काय होणार?

विन्स्टन चर्चिल, मार्गारेट थॅचर आणि महाराणी एलिझाबेथ

“ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणूनसुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं”, असंही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

राजमुकुटासोबत येणारं एकटेपण

“कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ द्वितीय यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? की राजघराण्याचा सूर्य मावळतोय? हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्या स्मृतीस अभिवादन”, असं आपल्या पोस्टमध्ये शेवटी राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray facebook post on britain queen elizabeth ii death pmw