मुंबईत शनिवारी ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक होणार आहे. कारण मनसेचा तेरावा वर्धापन दिन रंगशारदा या ठिकाणी साजरा होतो आहे. राज ठाकरे यावेळी कोणावर बोलणार काय टीका करणार याची चर्चा चांगलीच रंगली आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून एअर स्ट्राईकवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज ठाकरेंच्या भाषणात या सगळ्याचाही उल्लेख असण्याची शक्यता आहे. मुंबईत शनिवारी ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईकचे मेसेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांनो तयार रहा. या आशयाचे पोस्टर्स व्हायरल होत आहेत. शनिवारी ९ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची सभा रंगशारदा या ठिकाणी होणार आहे. राज ठाकरे यांच्या शब्दांचा कुणावर सर्जिकल स्ट्राईक होणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एअर स्ट्राईक करून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या वायुदलाचे राज ठाकरेंनी अभिनंदन केले. मात्र मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी पुण्यात गेले असताना आचारसंहिता लागू होण्याची वाट बघतो आहे. निवडणुका आल्या की बरोबर एकेकाची फाडतो असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.

Story img Loader