Raj Thackeray Interview: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दिवाळीनंतर राज ठाकरेंच्या प्रचाराच्या तोफा महाराष्ट्रभर धडाडणार आहेत. मात्र, त्याआधी एकीकडे जागावाटप, नाराजांची बंडखोरी, इच्छुकांची उमेदवारी, प्रचाराचा धडाका, आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण या गोष्टी घडत असताना दुसरीकडे राज ठाकरेंच्या काही हलक्या-फुलक्या मुलाखती चर्चेचा विषय ठरल्या आहेत. या मुलाखतींमधून राज ठाकरेंनी अनेक हटके प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली आहेत. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे राज ठाकरेंना आईच्या हातचं जेवण आवडतं की पत्नीच्या हातचं?

राज ठाकरेंचा हजरजबाबीपणा आणि मिश्किल वृत्ती सर्वश्रुत आहे. त्यांचे मिश्किल टोमणे जितके विनोदी वाटतात तितकेच ते टोकदारदेखील असतात. राज ठाकरेंनी विविध नेत्यांच्या केलेल्या नकला उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवतात. त्यामुळे राज ठाकरेंचा हाच दिलखुलासपणा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही दिसून येतो. त्यांची अशीच दिलखुलास मुलाखत त्यांचे जवळचे मित्र कुणाल विजयकर यांनी नुकतीच ‘खाने में क्या है’ या यूट्यूब चॅनलसाठी घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी त्यांच्या जेवणाबाबतच्या आवडी-निवडींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

मामलेदार मिसळ आणि शिवाजी पार्कवर वडापाव!

राज ठाकरेंनी त्यांचा आवडता पदार्थ म्हणजे मिसळपाव असल्याचं या मुलाखतीत कुणाल विजयकर यांना सांगितलं. तसेच, ठाण्यातील झणझणीत मामलेदार मिसळ त्यांना आवडते, असंही ते या मुलाखतीत म्हणाले. त्याशिवाय, शिवाजी पार्कवर लहानपणी क्रिकेट खेळण्याच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे व त्यांचे आई-वडील यांच्यासह राज ठाकरे शिवाजी पार्क परिसरात खाद्यभ्रमंती करत असत, अशी आठवण या मुलाखतीच्या निमित्ताने समोर आली. याचवेळी राज ठाकरेंना कुणाच्या हातचं जेवण आवडतं? असा प्रश्न केला असता लागलीच शर्मिला ठाकरे व त्यानंतर स्वत: राज ठाकरेंनीही त्याचं उत्तर दिलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी लढवलेली आणि जिंकलेली एकमेव निवडणूक कुठली? त्यांनीच दिलं उत्तर म्हणाले..

काय म्हणाले राज ठाकरे?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना त्यांच्या आईच्या हातचं जेवण आवडतं की पत्नीच्या हातचं? असा प्रश्न विचारला असता लागलीच त्यांच्या बाजूला बसलेल्या शर्मिला ठाकरे यांनी “अर्थात आई” असं उत्तर दिलं. या उत्तराला राज ठाकरेंनीही दिलखुलास दाद देत “आईच्या हातचं जेवण आवडतं याचं कारण विचारा”, असं म्हणत त्यामागचं खरं कारण सांगितलं. “मला आईच्या हातचंच जेवण आवडतं कारण आई किचनमध्ये गेली आहे”, असं राज ठाकरेंनी म्हणताच तिथे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

राज ठाकरेंनी लढवलेली एकमेव निवडणूक…

दरम्यान, याच मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी लढवलेल्या एकमेव मुलाखतीबाबत भाष्य केलं आहे. “आयुष्यात मी एकदाच निवडणूक लढवली होती. ती निवडणूक मी कॉलेजमध्ये लढवलेली होती. क्लास रिप्रेझेंटेटिव्ह निवडला जायचा त्याचं पद होतं. त्यासाठी मी निवडणूक लढवली होती. त्यात दोनच प्रतिस्पर्धी होते. एक मी दुसरा कुणाल विजयकर”, असं राज ठाकरे म्हणाले. या निवडणुकीत आपण जिंकलो होतो, असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.