मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ‘जमीन परिषद’ कार्यक्रमात बोलताना प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी चर्चा करण्याची इच्छा असल्याचं नमूद केलं. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांबाबतच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, “तुम्हाला कदाचित काही वर्षांनी आठवेल की राज ठाकरे आपल्याला सांगून गेला होता”, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. राज ठाकरेंच्या या मुद्द्यांवर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरेंनी या चर्चासत्रात महाराष्ट्राच्या विविध भागात होणाऱ्या जमिनीच्या व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला. “मराठी माणसाच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा मराठी माणसाला अंदाज आहे का? महाराष्ट्रात बाकीच्या राज्यातले नेते आधी त्यांच्या माणसाचा विचार करतात. आमच्याकडे ते होत नाही. मी काही अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी काही गावांची नावं सांगितली. ती गावं संपली आहेत. त्यांच्या जमिनी गेल्या आता. तुमची वैयक्तिक मालमत्ता विकावी की नाही हा माझा विषय नाही. पण नंतर ती कुणाच्या घशात जाते? तुम्हाला त्याचा योग्य मोबदला मिळतोय का?” असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले.
“बाहेरून येणाऱ्या उद्योगांत तुम्हाला भागीदारी का नाही?”
बाहेरून रायगड, रत्नागिरी या भागामध्ये येणाऱ्या उद्योगांमध्ये स्थानिकांना भागीदारी का दिली जात नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. “तुमच्या जमिनी हातातून जाणार. दुबईला फक्त व्यवसाय जरी करायचा असेल तर तुम्हाला तिथल्या एका अरबाला भागीदार म्हणून घ्यावं लागतं. मग रायगडमध्ये जर असे व्यवसाय येणार असतील, तर तुम्ही भागीदारी का नाही मागत? मी पर्याय सांगतोय तुम्हाला. उद्या तुमच्या सगळ्या पिढ्यांचा विषयच संपून जाईल. महाराष्ट्रात आपल्या लोकांना या गोष्टींचं भानच नाहीये”, असं राज ठाकरे म्हणाले.
“मुलं जन्माला घालण्यापलिकडे आपण कोणता शोध…”, राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
“तुम्ही सहज जमिनींचे रजिस्ट्रेशन होतात तिथे जाऊन बघा कुणाच्या नावावर जमिनी जात आहेत. रायगडच्या नेरळमध्ये इमारती उभ्या राहात आहेत. तिथे कोण फ्लॅट घेत आहेत जाऊन बघा. मराठी लोक आहेत का बघा. कर्जत, खालापूर हा पट्टा जातोय हातातून”, असंही त्यांनी नमूद केलं.
“…तेव्हा तुम्हाला आठवेल, राज ठाकरे सांगून गेला होता”
“तुम्ही आज दुर्लक्ष कराल, कालांतराने माझ्यावर विश्वास ठेवाल. तेव्हा आठवेल तुम्हाला की राज ठाकरे आपल्याला सांगून गेला होता. पण आपण लक्ष दिलं नाही. आपण ना घर का ना घाट का राहिलो. आपल्या हातून सगळं निघून गेलं. महाराष्ट्रात जे जे उत्तम आहे, ते सगळं हिसकावून घेण्याचा प्रयत्न सर्व बाजूंनी चालू आहे. पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी या मुद्द्यावर भाष्य केलं.
“ठाणे हा जगातला एकमेव जिल्हा आहे जिथे बाहेरून येणाऱ्या लोकांची सर्वाधिक संख्या आहे. रायगडमध्ये १ महानगर पालिका आहे. ठाणे जिल्ह्यात ७ महानगर पालिका आहेत. तिथल्या लोकांनी लोकसंख्या वाढवलेली नाही. बाहेरून मोठ्या संख्येनं येणाऱ्या लोकांमुळे तिथे संख्या वाढली. ७ महानगरपालिका असणारा एकही जिल्हा भारतात नाही. ते येतात तेव्हा तु्म्ही तुमचं स्वत्व हरवून जाता. त्यानंतर तुमच्याकडे फक्त कपाळावर पश्चात्तापाचा हात मारणं यापलीकडे काहीच नसणार. हो मी तुम्हाला घाबरवतोय. तुम्हाला धोका सांगतोय. माझा यात कोणताही व्यवहार नाही.पुढच्या चार-पाच वर्षांत परिस्थिती हाताबाहेर जाईल”, असा थेट इशारा यावेळी राज ठाकरेंनी दिला.