मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर सिनेमा आणण्याच्या तयारीत आहे अशी माहिती समोर आली आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना ही माहिती दिली आहे. विशेष बाब म्हणजे अभिजित पानसे यांनीच ‘ठाकरे’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. राज ठाकरेंच्या नजरेतून बाळासाहेब असा नवा चित्रपट तयार करण्याचा मानस आहे. कारण राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना जेवढं जवळून पाहिलं आहे तेवढं कोणीही पाहिलेलं नाही, अनुभवलेलं नाही त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंवर नवा सिनेमा येणार हे नक्की असंही पानसे यांनी सांगितलं.

औरंगाबादचा विकास करायचा असेल तर खासदार चंद्रकांत खैरेंना निवडून देऊ नका असंही अभिजित पानसे यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं. मनसेच्या लेझीम स्पर्धांच्या उद्घटनासाठी अभिजित पानसे औरंगाबादमध्ये आले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपली मतं मांडली. मनसेमध्ये गटबाजी आहे का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हटले की मनसेत गटबाजी मुळीच नाही, जे काम करतात तेच कार्यकर्ते नेत्यांसोबत दिसतात. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी मनसे आक्रमक होते आहे त्याचा प्रत्यय लवकरच शहरवासीयांना येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरे या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी ज्या काही घटना घडल्या त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर कडाडून टीका केली. चंद्रकांत खैरे औरंगाबादचे खासदार आहेत की महापालिकेचे हे आधी स्पष्ट करावे असा टोलाही पानसे यांनी लगावला. खैरेंना साधा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. त्यांच्यासारखेच शहरातील इतर शिवसेना नेतेही निष्क्रिय आहेत अशीही टीका पानसे यांनी केली.

Story img Loader