मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार ४० आमदारांसह भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करणार आहे, असं स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात सत्ताबदलाची चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही बड्या नेत्यांनी अशी अचानक भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी स्वत: प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदेंबरोबरच्या बैठकीत नेमकी चर्चा काय झाली? याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला.

हेही वाचा- “काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच…”, अंबादास दानवेंचं मोठं विधान!

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, “आज मुख्यमंत्र्यांची आणि माझी भेट झाली. मुंबईतील बरेच विषय प्रलंबित होते. त्यासंदर्भातील शिष्टमंडळं मी त्याठिकाणी बोलावली होती. यातील पहिला विषय असा होता की, वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प. या चाळीत राहणाऱ्या लोकांनाच माहीत नाही की, तिथे काय होणार आहे? तेथील रहिवाशांना किती स्क्वेअर फुटांची घरं मिळणार आहेत. तो परिसर खूप मोठा आहे, तिथे नेमकं काय होणार आहे? तिथे शाळा, दवाखाने, मैदाने अशा सुविधा उभारल्या जाणार आहेत का? यातील कोणत्याही गोष्टीची त्यांना कल्पना नसल्याने संबंधित अधिकारी या बैठकीत हजर होते. ते लवकरच याबाबतचं सादरीकरण बीडीडी चाळीतील रहिवाशांसमोर करणार आहेत. यामुळे बीडीडी चाळीतील लोकांना एकप्रकारे स्पष्टता येईल.”

हेही वाचा- “आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

“सिडको संदर्भातील घरांच्या किमती २२ लाखांवरून ३५ लाखांवर नेल्या आहेत. या किमती पुन्हा २२ लाखांवर कशा आणता येतील? याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. शिवाय पोलिसांच्या घरासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. सगळ्या प्रकरणात सकारात्मक प्रतिसाद मिळालाच पाहिजे, असं मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे,” अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray meet cm eknath shinde which topics discussed bdd development project rmm
Show comments