मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या वक्तृत्वशैली आणि भूमिका मांडण्याच्या पद्धतीमुळे राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असतात. लोकांमध्ये त्यांच्या या शैलीची मोठी चर्चा होते असंही दिसून आलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. या भाषणात आक्रमक मुद्दे जसे असतात तसेच विरोधकांना काढलले शाब्दिक चिमटेही असतात. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कोणत्या घडामोडींवर काय मत व्यक्त करतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंची पनवेलमध्ये जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्येही त्यांनी अशाच प्रकारे मिश्किलपणे काही विधानं केली. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी विरोधकांनाही टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरेंनी यावेळी महाराष्ट्रात सध्या चालू असलेल्या राजकारणावर भूमिका मांडली. “आत्ताची सध्याची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहाता मतदारांना काही किंमत आहे असं मला काही वाटतच नाही. तुम्ही फक्त यांचे नोकर आहात. मतदान करा आणि मोकळे व्हा. बाकी आम्ही आमचं काय नाचायचं ते नाचू. आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”, असं राज ठाकरे म्हणाले. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडणं टाळलं असलं, तरी सध्याच्या राजकीय स्थितीवर गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलेन, असं म्हटलं आहे.

विरोधकांना टोला!

दरम्यान, या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांनाही टोला लगावला आहे. मुलाखतकारांनी “राज ठाकरेंनी थोडं वाचन वाढवावं” अशी टीका करणाऱ्या टीकाकारांविषयी काय वाटतं, अशा आशयाचा प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी त्यावर मिश्किलपणे टोला लगावला. “हा त्यांच्या अज्ञानाचा भाग असतो. मला काही फरक पडत नाही या गोष्टींचा. पण मी जेव्हा त्यानंतर चार दुऱ्ऱ्या टाकतो, तेव्हा ते पॅक होतात. त्यापुढे त्यांना बोलता येत नाही”, असं राज ठाकरे आपल्या उत्तरात म्हणाले.

“…त्यासाठी तुमची आमच्या संघर्षाला साथ हवी”, राज ठाकरेंचं मराठी भाषिकांना आवाहन

“मी सामना वाचत नाही”

दरम्यान, वृत्तपत्रांचा मुद्दा निघाल्यानंतर राज ठाकरेंनी आपण मार्मिक आणि सामना वाचत नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. “मी सामना-मार्मिक वाचत नाही. माझ्याकडे हे दोन्ही येतात, पण मी वाचत नाही. हल्ली वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या फार नसतात. चॅनल्स तर बघवतच नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray mocks opposition targets maharashtra politics pmw