पुण्यात झालेल्या मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी संजय राऊतांची नक्कल केल्यानंतर त्यावर संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं. “आमचं राजकारण नकलांवर चालत नाही”, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रतिटोला लगावला होता. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंनी संजय राऊतांना खोचक सल्ला दिला आहे. दिव्यामध्ये मनसेच्या शाखेच्या उद्धाटनासाठी राज ठाकरे आले असता त्यांना पत्रकारांनी संजय राऊतांच्या विधानाविषयी विचारणा केली. यावेळी राज ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते संजय राऊत?

राज ठाकरेंनी नक्कल केल्यानंतर त्याचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला. यानंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना प्रतिटोला लगावला होता. “नक्कल मोठ्या माणसाचीच करतात. तुम्हीही बोला. सगळ्यांनी बोलावं अशी परिस्थिती आहे. आम्ही कुणाचे मिंधे नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. इथे डुप्लिकेट, नकली काही नाही. जे सत्य आहे, जे प्रखर आहे ते शिवसैनिक बोलणार. कर नाही त्याला डर कशाला? आमचं राजकारण नकलांवर उभं नाहीये. आमचं राजकारण कामावर, स्वाभिमानावर आणि संघर्षावर उभं आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते.

संजय राऊतांचा राज ठाकरेंना प्रतिटोला; म्हणाले, “आमचं राजकारण नकलांवर…!”

काय म्हणाले राज ठाकरे?

दिवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळील मुख्य बाजारपेठेतील एका गृहसंकुलात शनिवारी संध्याकाळी मनसेच्या दिवा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे बाहेर पडत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना संजय राऊतांच्या प्रत्युत्तराविषयी विचारणा केली असता त्यांनी राऊतांना खोचक सल्ला दिला आहे. “संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात नक्कल!

९ मार्च रोजी पुण्यात झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी भाषणादरम्यान संजय राऊतांची नक्कल केली होती. “ते संजय राऊत किती बोलतायत? सगळ्यात त्यांची एक अॅक्शन असते. कॅमेरा लागला की हे सुरू. कॅमेरा हटला की पुन्हा नॉर्मल. हे अॅक्शन कुठून आणतात?” असं म्हणत राज ठाकरेंनी यावेळी संजय राऊतांची नक्कल देखील करून दाखवली.

“ते संजय राऊत किती बोलतायत?”, राज ठाकरेंचा खोचक शब्दांत टोला; म्हणाले, “कॅमेरा लागला की हे…!”

“डोळे, भुवया उडवून बोलणं… बोलणं हा प्रश्न नाही. आपण किती बोलतो? आपण काय बोलतो? कसं बोलतो? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?” असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray mocks sanjay raut on mimicry statement pmw