पुण्यामध्ये आज मनसेच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज ठाकरेंनी उपस्थित सर्व सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामस्वच्छतेच्या मुद्द्यावर मार्गदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या खास शैलीत शोले चित्रपटातल्या रामगड गावाचं उदाहरण देताच उपस्थितामध्ये हशा पिकला. “माझ्या शालेय जीवनात मी पाहिलेली सर्वात भ्रष्ट ग्रामपंचायत म्हणजे शोलेमधली रामगडची ग्रामपंचायत”, असा टोला राज ठाकरेंनी यावेळी लगावला.
“मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की…”
प्रकृती बरी नसल्यामुळे आपण मेळाव्याला येणार नव्हतो, पण तुम्ही सगळे इतक्या लांबून आल्यामुळे मीही आलो, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. “तुम्हाला एकच सूचना करायची आहे. तुम्ही प्रामाणिक आहात, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इच्छुक आहात. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की गाव स्वच्छ ठेवा. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पैसा लागत नाही, इच्छा लागते. जेवढा परिसर स्वच्छ ठेवाल, तेवढी रोगराई लांब राहाते. आपल्या देशातच अशी अनेक गावं मी पाहिली आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.
“मी ८९ सालापासून राजकारणात आलोय. अनेकदा महाराष्ट्र फिरलो, अनेक गावांमध्ये गेलो. सगळ्या ठिकाणी मला स्वच्छतेबाबत दुरवस्था दिसली. त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मनही अस्वच्छ होतं. ग्रामीण भागातले तरुण शहरात येतायत. शहरातले तरुण विदेशात जातायत. ते का जातात? सभोवतालचं वातावरण त्यांना चांगलं मिळत नाहीये. तिथे जाऊनही अशा काय फार मोठ्या नोकऱ्या करतायत? सगळेच फार काही चांगल्या नोकऱ्या करत नाहीत. तो डंकी चित्रपट आलाय ना. लपून-छपून परदेशात जायचं. आणि तिथे स्वीपर म्हणून काम करायचं. ते तर इथेही मिळतं. आजूबाजूचं वातावरण चांगलं ठेवणं आवश्यक आहे. गावातल्या मुलांना त्या वातावरणात नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजेत”, असं राज ठाकरेंनी नमूद केलं.
राज ठाकरेंनी सांगितला ‘शोले’मधला किस्सा!
दरम्यान, राज ठाकरेंनी यावेळी बोलताना शोले चित्रपटातला प्रसंग सांगितला. “मी एका गावात गेलो होतो. नाव नाही सांगत मुद्दाम. त्या गावात लोडशेडिंग होतं. पण त्यालाही काही अर्थ नाही. ४८ तास वीज यायचीच नाही. स्वच्छतेची वाईट अवस्था होती. त्या गावात मी एक टाकी पाहिली. तेव्हा मला शोले चित्रपटातल्या रामगड गावाचीच आठवण झाली”, असं राज ठाकरे म्हणाले.
ढोकळा खायला बुलेट ट्रेनची गरज कशाला? राज ठाकरे यांचा टोला
“त्या रामगडच्या ठाकूरच्या घरात लाईटच नसते, पण…”
“मी विचार करत होतो की माझ्या शालेय जीवनात मी पहिल्यांदा पाहिलेली भ्रष्टाचारी ग्रामपंचायत म्हणजे रामगड ग्रामपंचायत. तुम्ही शोलेमधली ती ग्रामपंचातय पाहिली आहे ना. त्या गावातल्या सर्वात श्रीमंत ठाकूरच्या घरात लाईट नाही. पण त्या गावात टाकी आहे. त्या ठाकूरचा बाप चढवणार होता का पाणी? त्या गावात मी जेव्हा टाकी पाहिली, तेव्हा मला रामगडची टाकीच आठवली. त्या टाकीला बाकी काहीच नव्हतं. अशा गोष्टी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून होता कामा नयेत. गावात गेल्यानंतर आधीच्या पिढ्यांमधल्या लोकांना वाटलं पाहिजे की काम करावं तर या लोकांनी, नाहीतर करू नये”, असा सल्ला राज ठाकरेंनी उपस्थितांना दिला.