Raj Thackeray Speech : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड झाल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जातं. यासाठी याआधी नारायण राणे, छगन भुजबळ यांच्या बंडखोरीचा देखील दाखला दिला जातो. मात्र, त्यासोबतच राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्याच्या घटनेचा देखील राजकीय विश्लेषकांकडून उल्लेख केला जातो. या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी तीव्र आक्षेप घेतला आहे. शिंदे, राणे, भुजबळांच्या बंडाशी माझी तुलना करू नका, असं राज ठाकरेंनी बजावलं आहे. मनसे पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सध्याच्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रासाठी चांगल्या नाहीत”

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर यावेळी राज ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. “गेल्या दोन-अडीच वर्षात महाराष्ट्रात जे काही चाललंय, ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही. महाराष्ट्रात असं कधीही नव्हतं. ज्या मतदारांनी २०१९ला मतदान केलं, त्यांना कळतही नसेल की आपण मतदान कुणाला केलं? कोण कुणामध्ये मिसळलं आणि कोण कुणामधून बाहेर आलं काहीच कळत नाहीये. हे खरं राजकारण आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हे खरं राजकारण नव्हे. ही तात्पुरती सत्तेसाठीची आर्थिक तडजोड आहे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“माझी तुलना त्यांच्याशी करू नका”

दरम्यान, छगन भुजबळ, नारायण राणे आणि नुकतीच झालेली एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी या कुणाशीही आपली तुलना करू नका, मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो होतो, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. “माझं बंड भुजबळ, राणे, शिंदेंच्या बंडाच्या यादीत घेऊ नका. हे सगळे एका पक्षात गेले, सत्तेत गेले. पण मी बाळासाहेब ठाकरेंना भेटून, त्यांना सांगून बाहेर पडलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की राज ठाकरे आता पक्षात राहात नाही.. ती माझी शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वीची शेवटची भेट होती”, असं राज ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंसोबत झालेली ‘ती’ भेट!

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीवर भेटल्याचा प्रसंग सांगितला. “मी आजपर्यंत ती गोष्ट तुम्हाला कधी बोललो नाही. मी मातोश्रीवर गेलो तेव्हा तिथे माझ्यासोबत मनोहर जोशी होते. ते खोलीच्या बाहेर गेल्यानंतर बाळासाहेबांनी मला बोलवलं. माझ्यासमोर अलिंगनासाठी हात पुढे केले. मला मिठी मारली आणि म्हणाले ‘आता जा’. त्यांना समजलं होतं मी जाणार आहे.. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडलेलो नाही. कुठल्याही दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. तुमच्या विश्वासावर नवा पक्ष उभा केला. आजपर्यंत आपल्या पक्षानं जेवढी आंदोलनं केली. इतर कोणत्याही राजकीय पक्षानं इतकी आंदोलनं केली नाहीत आणि यशस्वी केली नाहीत”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray on eknath shinde rebel mla shivsena balasaheb thackeray pmw
Show comments