गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलनाक्यांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुद्दा मांडण्याची भूमिका जाहीर केली. यासंदर्भात आज पुन्हा एकदा राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारला राज्यातील टोलनाके जाळून टाकण्याचा थेट इशाराही राज ठाकरेंनी यावेळी दिला.
काय म्हणाले राज ठाकरे?
“गेल्या चार दिवसांपासून अविनाश जाधव आणि इतर सहकारी ठाण्यात ५ ठिकाणी झालेल्या टोलवाढीच्या विरोधात उपोषणाला बसले होते. मला राज्य सराकरकडून एक पत्र आलंय. त्यात सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. कुणाकुणाला टोल नाहीये, कुणाला टोल आहे असं त्यात लिहिलं होतं. टोलचा सगळा पैसा कॅशमध्ये आहे. हा पैसा जातो कुठे? याचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे? त्यानंतरही रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हा पैसा जातो कुठे? आपण रोड टॅक्स भरतो, तो कुठे जातो? हे कुणालाही कळत नाही. अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्या वाट्याला येतात”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलमुक्त महाराष्ट्रसंदर्भात केलेल्या जुन्या विधानांच्या व्हिडीओ क्लिप्स पत्रकारांना ऐकवल्या. “सेना-भाजपा युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी होती. आत्ता काय आहे, त्याचं काय मातेरं झालंय हे कुणालाच माहिती नाही. तेव्हा हे पक्ष काय म्हणाले ते मी एकेक मिनिटाच्या क्लिपवरून दाखवतो”, असं म्हणत त्यांनी व्हिडीओ क्लिप्स ऐकवल्या. यात ही नेतेमंडळी आपलं सरकार आल्यानंतर किंवा अमुक तारखेपर्यंत महाराष्ट्र टोलमुक्त करण्यासंदर्भात दावे करत असल्याचं दिसत आहे.
“…हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे”
“त्यांच्याकडे दर आठवड्याला, दर दिवसाला टोलचे पैसे जात असतात. हे सगळे एवढ्या थापा मारतात. त्यानंतर त्याच त्याच पक्षाला मतदान कसं होतं, हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
“..मग राज्य सरकारला काय करायचंय ते करावं”
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी रविवारी माध्यमांशी बोलताना फक्त कमर्शियल गाड्यांनाच टोल आकारणी होत असल्याच्या केलेल्या विधानावरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. “हे धादांत खोटं आहे. जर टोलमुक्ती झाल्यानंतरही आपण टोल देत असू, तर हे पैसे जातायत कुठे? टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यांचं काय उत्तर येतंय बघू. नाहीतर आत्ता उपमुख्यमंत्र्यांनी सांगिलंय की चारचाकी, दुचाकींना टोल नाही. मग आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभं राहून चारचाकींना टोल भरू देणार नाही. याला जर त्यांनी विरोध केला, तर आम्ही हे सगळे टोलनाके जाळून टाकू. पुढे महाराष्ट्र सरकारला काय करायचंय ते सरकारनं करावं”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“एकनाथ शिंदेंना मला प्रश्न विचारायचा आहे की…”, टोल दरवाढीसंदर्भात राज ठाकरे संतापले, म्हणाले…
“याच गोष्टीसाठी आमच्या लोकांनी आंदोलनं केली. मनसैनिकांनी केसेस घेतल्या. वर हे सांगतायत असं काही नाहीचे. मग त्या केसेस काढून टाका. जर राज्य सरकार म्हणतंय चारचाकी, तीनचाकी व दुचाकीसाठी टोल घेतला जात नाहीये, याचा अर्थ हे टोलवाले लुटतायत. पुढच्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटून यावर बोलेन”, असंही ते म्हणाले.