गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय का घेतला? याआधी घेतलेल्या भूमिका आणि आता बदललेली भूमिका यामागे त्यांचा काय दृष्टीकोन होता, याचेही त्यांनी विश्लेषण केले. या पत्रकार परिषदेत त्यांना वसंत मोरेंबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र राज ठाकरेंनी त्यावर काहीही न बोलता हातवारे करून प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान मोदींना पाठिंबा का दिला?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर उलटसुलट चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंनी आज आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच मनसेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी या कारणावरून राजीनामे दिले, त्यांच्यावरही भाष्य केले. आपल्या बदललेल्या भूमिकेसाठी त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. २०१४ साली त्यांनी निवडणुकीच्या आधी घेतलेली भूमिका नंतर बदलली होती, असे राज ठाकरे म्हणाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेने भाजपाशी युती तोडली होती. निवडणुकीच्या निकालानंतर काही महिन्यांनी पुन्हा भाजपासह सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता.
महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मनसेची पुढची भूमिका काय? राज ठाकरेंनी दिली सविस्तर माहिती, म्हणाले…
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत असताना महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून, गडकिल्ल्याचं संवर्धन, औद्योगिकीकरणाबाबत महाराष्ट्रालाही प्रकल्प देण्यासंदर्भात चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
वसंत मोरेंचा प्रश्न विचारताच…
दरम्यान यावेळी वसंत मोरेंच्या बाबतचा एक प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरेंनी कोणतीही प्रतिक्रिया न देता पत्रकाराच्या दिशेने केवळ हात जोडले आणि ते पत्रकार परिषदेतून उठून चालू लागले. यानंतर पदाधिकाऱ्यांना बाईट देऊन जा, असे ते म्हणाले तेव्हा मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.
राज ठाकरेंनी मला पाठिंबा द्यावा – वसंत मोरे
दरम्यान वसंत मोरे यांनी मात्र नाराजीनंतरही राज ठाकरेंची भेट घेणार असे सांगितले आहे. वृत्तवाहिन्यांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, मनसे सोडण्यासाठी स्थानिक पदाधिकारी कारणीभूत आहेत. मी आता वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवित असलो तरी राज ठाकरे यांनी मला लोकसभेत पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणार आहे.
सुनेत्रा पवारांसाठी प्रचारसभा घेणार का? राज ठाकरेंचं उत्तर, म्हणाले, “मैदानं..”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात घेतलेल्या सभेत भाऊ (धंगेकर), तात्या (वसंत मोरे) यांच्यापैकी कुणी नाही तर केवळ मुरलीअण्णा (मुरलीधर मोहोळ) जिंकणार, असे विधान केले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना वसंत मोरे म्हणाले की, माझी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली यातच सर्व आले. वसंत मोरे काय आहे? हे पुणेकरांना चांगले माहीत त्यामुळे पुणेकर मलाच निवडून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.