भारतातील निवडणुका या ईव्हीएमच्या मदतीने होतात. मात्र याला अनेक विरोधी पक्ष विरोध करतात. ईव्हीएम मशीनवर बंद करावी, अशी मागणी या विरोधकांकडून केली जाते. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ईव्हीएमवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ईव्हीएममुळे मत कोणाला दिलं याची माहिती मतदारांना मिळत नाही. त्यामुळे जुन्याच पद्धतीने मतदान घ्यायला काय हरकत आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ते आज (२४ फेब्रवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“जगातल्या सर्व पुढारलेल्या देशांत मतदान हे कागदावर होते. शिक्क्यांच्या मदतीने हे मतदान होते. मग आपण ईव्हीएम का घेऊन बसलो आहोत. बटण दाबल्यानंतर कोणाला मतदान केले हेच समजत नाही. माझं मतदान झालंय की झालं नाही हेदेखील समजत नाही. फक्त एक आवाज येतो. यापलीकडे काहीही कळत नाही. मतदाराने ज्याला मतदान केले आहे, त्यालाच मत मिळते का?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच मध्यंतरी मतदान केल्यानंतर एक स्लीप येणार असा नियम केला होता. ही सुविधादेखील सर्व ठिकाणी नाही, असेदेखील राज ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
राज ठाकरेंच्या याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल हास्य करत प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरेंना याआधी ईव्हीएम चांगली वाटत होती. आता त्यांना ती योग्य वाटत नाहीये. लवकरच त्यांना ईव्हीएम पुन्हा एकदा चांगली वाटायला लागेल,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
मनसेच्या महायुतीतील समावेशावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या मनसेचा भाजपा, शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीत समावेश होऊ, शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावरही राज ठाकरेंनी भाष्य केले. एखाद्या नेत्याला अन्य पक्षाच्या नेत्यासोबत व्यासपीठावर एकत्र पाहिलं म्हणजे युती झाली असं नसतं. व्यासपीठावर दोन नेते एकत्र येण्याने युती होत नसते. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आमच्या मनसे पक्षाच्या मुंबईत तीन ते चार बैठका झाल्या आहेत. आता आम्ही शाखाध्यक्षांसोबत बैठका घेत आहोत. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी या लोकसभा मतदारसंघांसाठी आम्ही बैठका घेत आहोत. आमची चाचपणी चालू आहे,” असे राज ठाकरे यांनी सांगितले.