Shankarrao Chavan Government Hospital Nanded Deaths: नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात अवघ्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये १२ बालकांचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे. औषधांच्या तुटवड्यामुळे हे रुग्ण दगावल्याचं बोललं जात असून त्यावरून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या प्रकरणावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय घडलंय नांदेडमध्ये?
सोमवारी नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयातील रुग्ण मृत्यू प्रकरणावरून वाद सुरू झाला. औषधाच्या तुटवड्यामुळे आपले रुग्ण दगावल्याचा आरोप काही नातेवाईकांनी केल्यानंतर या मुद्द्यावरून वातावरण तापलं. २४ तासांच्या कालावधीत या रुग्णालयात एकूण २४ रुग्ण दगावले असून त्यात १२ बालके आहेत. त्यामध्ये ६ मुलं तर ६ मुलींचा समावेश आहे. यासंदर्भात माहिती घेऊन कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तर विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरेंचं सरकारवर टीकास्र
दरम्यान, या प्रकरणावरून राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. “नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासांत २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधांचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय”, असा धक्कादायक दावा राज ठाकरेंनी एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये केला आहे.
“तीन पक्ष ठणठणीत, बाकी सगळे आजारी”
“ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
रुग्णालय प्रशासनानं दावे फेटाळले
दरम्यान, औषधांचा तुटवडा किंवा निष्काळजीपणाचे आरोप रुग्णालय प्रशासनानं फेटाळले आहेत.”गंभीर व्याधींमुळे मृत्यू झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांना २४ तास सेवा दिलेली आहे. त्यांना असलेले आजार असे होते की ते वाचू शकले नाही. रोज १० ते १६ रुग्ण गंभीर आजार असलेले रुग्ण रुग्णालयात येतात आणि त्यांचा मृत्यू होतो. यामध्ये निष्काळजीपणा, औषधांचा तुटवडा अजिबात नाही”, असं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलं आहे.