‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्रजी पवार’ गटाला निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणाऱ्या व्यक्तीचे चिन्ह दिले आहे. शरद पवार गटाकडून या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावरुन करण्यात आले. याबद्दल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आज प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “तुतारी मिळाली तर फुंका आता. छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला. मी मागेही यावर बोललो आहे. फुले-शाहू-आंबेडकर नाव घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत? असा प्रश्न मी त्यांना मागेही विचारला होता. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली.”
तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “रणशिंग फुंकायला…”
असं विचित्र वातावरण कधी पाहिलं नव्हतं
पुण्यात काही दिवसांपूर्वी १०० व्या नाट्य संमेलन कार्यक्रमात काही राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मला भेटले, अशी एक आठवण राज ठाकरेंनी सांगितली. ते म्हणाले, “मी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विचारलं कोणत्या गटाचे? तेव्हा दोन-तीन जण म्हणाले शरद पवार गटाचे तर बाकीचे काही जण म्हणाले अजित पवार गटातून आहोत. असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहीजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहिल.”
“महाराष्ट्राचे जुने दिवस आणायचे असतील तर जनतेनं याचं भान ठेवलं पाहीजे. केंद्रात पंतप्रधान मोदी यांना आणायचं, इथपर्यंत ठिक आहे. पण जमिनीवर जर अशाप्रकारचे राजकारण होत राहिले, तर ते राज्यासाठी फार पोषक आहे, असे म्हणता येणार नाही. भविष्यात जे तरूण-तरूणी राजकारणात येऊ इच्छितात, त्यांना हेच राजकारण आहे, असे वाटू शकेल. त्यामुळे राजकारण आणखी खराब होत राहिल”, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया दिली. “मला असं वाटतं की आमदार गणपत गायकवाडांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याच्या खोलात जायला हवं. एखादा माणूस इतक्या टोकाला का जाईल? एखादा माणूस पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार का करेल? हेदेखील तपासलं पाहिजे. कुठलीही व्यक्ती इथपर्यंतचा निर्णय का घेत असेल? पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करण्यापर्यंत टोकाचं पाऊल का उचललं असेल? त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल? इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची परिस्थिती का उद्भवली असेल. हे प्रकरण इथपर्यंत कोणी आणलं? याबाबतची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.