उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक असणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे योगी आदित्यनाथ यांना आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं, असा इशारच राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमधून दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?

योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार राज्याबाहेर काम करणाऱ्या मजुरांसाठी नवे धोरण करणार असल्याची माहिती दिली. या धोरणामध्ये मजुरांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कठोर नियमांचा समावेश येणार आहे अशी माहिती योगी यांनी दिली. “कोणत्याही राज्याला मनुष्यबळाची गरज असेल तर त्या राज्याला आधी या कामगारांची सामाजिक सुरक्षा आणि विम्याचे आश्वासन द्यावे लागेल. आमच्या परवानगीशिवाय त्यांना राज्यातील लोकांना रोजगार देता येणार नाही. काही राज्यांनी ज्या पद्धतीने या मजुरांचा प्रश्न हाताळताना त्यांना वागणूक दिली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती योगी यांनी दिली. योगी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

आणखी वाचा- यापुढे युपीमधील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी बंधनकारक: योगी

राज यांचे उत्तर

योगी यांनी नव्या नियमांसंदर्भातील वक्तव्य केल्यानंतर यावरुनच राज यांनी योगींचा थेट उल्लेख करत त्यांना इशारा दिला आहे. एका फेसबुक पोस्टमधून यासंदर्भात राज यांनी आपले मत मांडताना, “उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावं,” असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारला सल्ला

योगी यांनी दिलेल्या इशाऱ्यावरुनच राज यांनी महाराष्ट्र सरकारलाही सल्ला दिला आहे. “महाराष्ट्र राज्य सरकारनेही या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. यापुढे कामगार आतमध्ये (राज्यामध्ये) आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा,” असं राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मागील काही दिवसांपासून योगी आदित्यनाथ आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक वाद सुरु आहेत. स्थलांतरितांच्या प्रश्नावरुन दोन्ही पक्षांकडून एकेमकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. या वादात आता राज यांनाही उडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray slams yogi adityanath says migrants have to take permission if they want to return scsg