गेल्या महिन्याभरात इंडिया नव्हे, भारत म्हणण्याचा वाद चर्चेला आला होता. भाजपाविरोधी आघाडीचं नाव ‘इंडिया’ ठेवण्यात आल्यापासून भाजपाकडून देशाचं नाव ‘इंडिया’ न घेता ‘भारत’ घेण्याचा आग्रह केला जाऊ लागला होता. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक अशा दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू असताना दुसरीकडे त्याचा उल्लेख करत राज ठाकरेंनी खोचक टिप्पणी केली आहे. दादरमधील सावरकर स्मारक सभागृहात बोलताना राज ठाकरेंनी आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांसंदर्भात उपस्थित मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
विरोधी पक्षांच्या आघाडीचं नाव इंडिया ठेवण्यात आल्यापासून त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाकडून या नावावर तीव्र आक्षेप घेण्यात आलं. तसेच ही ‘इंडिया’ आघाडी नसून ‘इंडी’ आघाडी असल्याचंही भाजपाकडून सांगण्यात आलं. त्यावरून विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत आगपाखड केली. भाजपाला आत्ताच इंडिया नावावर आक्षेप का येऊ लागला आहे? असा प्रश्न करत राज्यघटनेतही ‘इंडिया’ असा उल्लेख असल्याचा मु्दा उपस्थित करण्यात आला.
“…याला म्हणतात लोकशाही”
मनसेच्या दादर येथील मेळाव्यात राज ठाकरेंनी याचा उल्लेख करताना निवडणूक प्रक्रियेसंदर्भात भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उमेदवारांसाठी शिक्षणाची पात्रता नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. “भारत काय, इंडिया काय, हिंदुस्तान काय..आपला एकमेव देश असेल जगातला जिथे या प्रकारची लोकशाही चालते. मला मध्यंतरी कुणीतरी पदवीधर विधानसभा निवडणुकीचा फॉर्म दाखवला होता. त्यात खाली लिहिलं होतं ‘उमेदवाराची सही किंवा अंगठा’. म्हणजे उमेदवार पदवीधर असलाच पाहिजे अशी काही अट नाही. पण मतदार पदवीधर असलाच पाहिजे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचंही तेच आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, ‘अजूनही तसंच आहे का?’ असा प्रश्न त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांकडे वळून विचारला. तिथून होकारार्थी उत्तर येताच पुन्हा श्रोत्यांकडे वळून, “घ्या..अजूनही तसंच आहे. याला म्हणतात लोकशाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
“मला बोलताही येत नव्हतं”
दरम्यान, हा मेळावा दोन दिवस उशीरा घेण्याचं कारण यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं. “मी काही मोठं भाषण करायला आलेलो नाही. परवा १६ तारखेलाच हा मेळावा ठरलेला होता. पण नेमकं त्यावेळी मला जरा ताप आल्यासारखं वाटत होतं. खोकला, सर्दी चालू होतं. बोलणंही शक्य नव्हतं. मग म्हटलं येऊन करायचं काय? महेश मांजरेकरांच्या नाटकाचा १००वा प्रयोग होता, तिथेही मला जाता आलं नाही. मी घरात झोपून होतो”, असं राज ठाकरे म्हणाले.