नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रावर आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील मराठी भाषेच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी, अशी विनंती राज ठाकरेंनी यावेळी केली. तसेच, समोर येणाऱ्या प्रत्येकाशी मराठीतच बोला, असं आवाहनही राज ठाकरेंनी उपस्थितांना केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केलेला उल्लेख चर्चेचा विषय ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरेंनी यावेळी आपण कडवट मराठी असल्याचा उल्लेख केला. “मी आजपर्यंत मराठी विषयावर तुरुंगातही जाऊन आलो. मी कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारच त्या प्रकारचे झाले आहेत. आपण आधी महाराष्ट्रात लक्ष देणं गरजेचं आहे. जगभरात मराठी माणूस गेला आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे. पण महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये मराठी सोडून जेव्हा हिंदी माझ्या कानावर येते, तेव्हा त्रास व्हायला लागतो. भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. जशा इतर भाषा आहेत, तशीच हिंदी एक भाषा आहे. देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“..हे पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते”

“आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले. बोलण्यात आपण मराठी लोक हिंदी का वापरतो? इतकी उत्तम मराठी भाषा आहे. मराठी भाषेत जो विनोद होतो, तो दुसऱ्या कुठल्या भाषेत होत असेल असं मला वाटत नाही. पण आज ही भाषा बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न होतोय. ते पाहून माझी तळपायाची आग मस्तकात जाते.महाराष्ट्रातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करायला हवी”, अशी मागणी यावेळी राज ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.

Video: “अजून काय पाहिजे राव…”, राज ठाकरेंनी ‘चला हवा येऊ द्या’मधील ‘या’ कलाकाराच्या व्यवसायाचं केलं कौतुक, पोस्ट करत म्हणाला…

“जिथे तुमचा जन्म झाला, जिथे तुमची मुलं झाली, त्या मुलांना शाळेत जर्मन, फ्रेंच शिकवलं जातंय. इतर भाषा शिका. पण जिथे राहाताय, तिथली स्थानिक मातृभाषा तरी शिका आधी. यात कमीपणा कसला आला? मराठीबद्दल बोललं की तुम्ही म्हणणार हे संकुचित आहेत. या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल वाटतं, जगातला सर्वात मोठा पुतळा त्यांना गुजरातमध्ये बांधावासा वाटतो, गिफ्ट सिटी पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावी वाटत असेल, हिऱ्यांचा व्यापार त्यांना गुजरातमध्ये न्यावासा वाटतो, जर पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही-आम्ही का लपवतोय? ही पंतप्रधानांवरची टीका नाही”, असा मुद्दा राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

“आम्ही काय गोट्या आहोत का?”

“प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल, भाषेबद्दल प्रेम आहे. तुम्ही का लपवताय? जेव्हा जैन सोसायटीतला एखादा माणूस मराठी माणसाला घर देणार नाही असं सांगतो, तेव्हा आम्ही काय करायचं? हे असं तामिळनाडूत, पश्चिम बंगालमध्ये, गुजरातमध्ये, आसाममध्ये, आंध्र प्रदेशात, केरळमध्ये करून दाखवा. हे महाराष्ट्रात का होतं? याला कारण आमचं बोटचेपे धोरण. आम्हीच पहिले मागे हटतो”, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच, “सगळे राज्य आपापली भाषा जपतात, मग आम्ही काय गोट्या आहोत का सारखे घरंगळत जायला? आम्हीच का सारखे घरंगळत दुसऱ्या भाषेत सारखे जातो?” असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray speaks on marathi language in mahaashtra pmw