मनसेच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्ताने नाशिकमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. भारतीय जनता पक्षावर टीका करतानाच त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचाही मुद्दा उपस्थित केला. आपण सविस्तर येत्या ९ एप्रिलच्या पाडवा मेळाव्यात बोलणार असल्याचं नमूद करतानाच राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे सोशल मीडियावरून कान टोचले. त्यांनी केलेली टिप्पणी ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सोशल मीडियाचा आपण जबाबदारीने वापर करायला हवा, असं उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सांगितलं. “आधीचे वक्ते केतन जोशी जे तुम्हाला सांगत होते, ते तुमच्यासाठी समजावत होते. सोशल मीडिया आपण कशाप्रकारे वापरला पाहिजे? राजकारणासाठी म्हणून याचा कसा वापर केला पाहिजे? लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचलं पाहिजे? इतकं शक्तीशाली-महत्त्वाचं माध्यम तुमच्या हातात आहे,ज्याच्यावर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत खेळत असता, ते तुम्ही कसं वापरलं पाहिजे? त्याचा उपयोग पक्षाला कसा होऊ शकेल? हे ते समजावून सांगत होते. खरंच आहे ते”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“…हे कुणीही पाहात नाही!”

“माझ्याही बाबतीत काहीकाही टाकत असतात. गाडी येते. दरवाजा उघडतो. मी खाली उतरतो आणि मागे ‘आरारारारारा’ (मनसेच्या गाण्यातील भाग). आरे काय आहे? म्हणजे काय? यातून हाताला काय लागलं? ना तुमच्या ना माझ्या. काहीतरी गाड्या दाखवायच्या, लाईट दाखवायच्या, माणसं उतरताना दाखवायची. कुणीही ते पाहात नाही”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

Raj Thackeray: नाशिकमध्ये राज ठाकरेंचा ताफा १५ मिनिटं एकाच जागी का थांबला? ‘या’ चर्चांना उधाण

“तुम्ही पक्षाच्या नावाने सोशल मीडियावर तुमचा कंटेंट लोकांपर्यंत पाठवता. पण पक्ष असला, मग तो कोणताही असो, लोक पाहात नाहीत. त्यातून कोणती गोष्ट ऐकायला, पाहायला मिळणार असेल तर लोक पाहातात. अन्यथा ते पाहात नाहीत. पण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा? यासंदर्भात केतन जोशींची व्याख्यानं मी महाराष्ट्रातील शहराशहरांत मनसैनिकांसाठी ठेवणार आहे. ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा आहे, त्यांनीच तिथे यावं”, असं राज ठाकरेंनी उपस्थितांना सांगितलं.

“नशीब शिवाजी महाराजांच्या वेळी सोशल मीडिया नव्हता”

दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरेंनी “नशीब महाराजांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता आणि आजचे पत्रकारही नव्हते”, असी कोटी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. “…नाहीतर पत्रकार परिषदेत विचारलं असतं, महाराज, जरा तो गनिमी कावा काय आहे ते सांगता का? मला एका माणसानं प्रश्न विचारला की नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभा घेतायत, तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील? मी म्हटलं माझ्या लक्षातच आलं नाही हे. तू माझे डोळेच उघडलेस. हा काय प्रश्न आहे?” असा खोचक प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray speech in 18th anniversary melava nasik pmw