मागील जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला आहे. दररोज नवनवीन हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. मणिपूरमधील संतप्त जमावाने भाजपा मंत्र्यांच्या घरावरही हल्ला केला आहे. मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यावर मौन बाळगलं आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाहांना उद्देशून पत्र लिहिलं आहे.
केंद्र सरकारने लवकरात लवकर मणिपूरमधील हिंसाचार थांबवावा, अन्यथा मणिपूरसह ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल, याला केंद्र सरकार जबाबदार असेल, अशा आशयाचं पत्र राज ठाकरेंनी लिहिलं आहे. तसेच मणिपूरमधील सध्याचं नेतृत्व परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्लाही राज ठाकरेंनी पत्राद्वारे दिला.
हेही वाचा- Rahul Gandhi Manipur Visit: राहुल गांधींनी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त पीडितांची घेतली भेट
राज ठाकरेंनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
राज ठाकरे पत्रात म्हणाले, “ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दश: असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला, इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश का येतंय? हेच कळत नाही.”
हेही वाचा- मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना; संतप्त जमावाने भाजपा मंत्र्याच्या मालमत्तेला लावली आग
“ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला दूषणं द्यायचे. पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना, त्यांनी मौन का बाळगलं आहे, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये राहिले होते, तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल, असं वाटलं होतं, असं राज ठाकरेंनी पत्रात नमूद केलं.
राज ठाकरे पुढे म्हणाले, “मणिपूरचं सध्याचं नेतृत्व जर परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर योग्य तो निर्णय भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाने घ्यावा. ईशान्यकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे, ते पाहून वाजपेयींचे सर्व प्रयत्न वाया जातील, अशी भीती वाटते. वेळीच मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातला तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल. म्हणून माझी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे की, ठोस पावलं उचला आणि मणिपूर पूर्ववत होईल, ते पाहा.”