आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा मिळण्याबाबत होत असलेली चालढकल पाहून तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ‘एनडीए’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१९ च्या लोकसभा निवडणुका अवघ्या वर्षभरावर आलेल्या असताना चंद्राबाबूंनी एनडीएला रामराम करणं ही मोठी घडामोड मानली जातेय. याच राजकीय घडामोडीचा आधार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून शिवसेनेला टीकेचं लक्ष्य बनवलं आहे. आपल्या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या, ‘सत्तेतून बाहेर पडू’ या घोषणेची खिल्ली उडवली आहे.
अवश्य वाचा – तेलगू देसम पार्टीच्या दोन्ही मंत्र्यांनी पंतप्रधानांकडे सोपवले राजीनामे
आपल्या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी चंद्राबाबू नायडू यांना हातात बॅग आणि दुसऱ्या हातात एक गाठोड घेऊन घराबाहेर पडताना दाखवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमकीची खिल्ली उडवली आहे. “यात कसला आलाय ‘मर्द’पणा? त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन पहा”, असा मार्मिक संदेश देत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शिवसेनेवर कुरघोडी केली आहे.
विभाजनानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरुन केंद्र सरकार आणि आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही. मात्र, राज्यासाठी विशेष पॅकेज देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी पत्रकार स्पष्ट केले. मात्र यावर समाधान न झाल्याने चंद्राबाबूंनी केंद्रीय मंत्रीमंडळातील आपल्या दोन मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या मंत्र्यांनी आपले राजीनामे पंतप्रधान मोदी यांच्याकडे सोपवत मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.