मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेना महाराष्ट्रातील सरकारमधून बाहेर पडली आहे. पण आता ठाकरे कुटुंबीयांनी पक्ष वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माझ्याकडे शिवसेना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना म्हटले होते. एकनाथ शिंदे गटाचा संदर्भ देत ते म्हणाले होते की, त्यांना सत्तेचा आशीर्वाद मिळावा, पण माझ्याकडे शिवसेना आहे. आता यावरच काम करत आदित्य ठाकरे यांनी ‘निष्ठा यात्रा’ काढली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारपासून निष्ठा यात्रा सुरु केली आहे. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मुंबईतील शिवसेनेच्या शाखांना भेटी देणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भायखळ्यातील बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी या यात्रेची सुरुवात केली. यावरुनच आता मनसेने आदित्य ठाकरेना टोला लगावला आहे.
भाजपाची सी टीम म्हणत याआधी आदित्य ठाकरेंनी मनसेवर टीका केली होती. “मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं,” असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. तसेच संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.
यानंतर आता शिवसेनेतील बंडानंतर मनसेने आदित्य ठाकरेंवर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. मनसेच्या मनसे वृत्तांत अधिकृत या फेसबुक पेजवरुन आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
आदित्य ठाकरेंनी कसे बोलावे हे उद्धव ठाकरेंकडून शिकावे, संजय राऊतांकडून नाही – दीपक केसरकर
“नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! शिल्लकसेना,” असे मनसेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिवसेनेवर उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव जबाबदार – नारायण राणे
दरम्यान, पक्षावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी आपापल्या भागात जाऊन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा सांगायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही स्थिती दूर करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मोर्चेबांधणी केली असून ते निष्ठा यात्रा काढणार आहेत. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही शिवसेना ही भेट महत्त्वाची मानत आहे.