शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी औरंगाबादमध्ये मनसे सैनिकांच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी शहरात दंडुका मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चामध्ये दंडुका अथवा त्याप्रकारचे कोणतेही इतर शस्त्र बाळगण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परिणामी प्रतिबंधात्मक आदेश न पाळल्याने मनसेच्या दंडुका मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोर्चात दंडुका आणण्यास पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रतिनिधीक स्वरूपात दंडुके आणि उसाचे टिपरू घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते. मनसे नेता संदिप देशपांडेंसह औरंगाबाद मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या मोर्चाची सुरुवात पैठण गेट येथून दुपारी तीन वाजता झाली होती. सध्याचे सत्ताधारी शेतकऱ्यांसाठी साक्षात यम ठरल्यामुळे रेड्यासह ‘यम रूप’ धारण करून मनसैनिकांनी शासनाचा निषेध करत मोर्चाची सुरुवात केली. या मोर्चात आंदोलक बैलगाडी घेऊन सामील झाले होते. यावेळी ‘शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध’ असे बॅनर लावलेल्या हेल्याने आणि यमाची वेषभूषा साकारलेल्या मोर्चेकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत मनसेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नसल्याबद्दल भाजप सरकारला धारेवर धरत प्रश्न न सोडवल्यास दंडुके धरू, असा इशारा दिला.