मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार असून त्यावरून राजकीय वर्तुळात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेकडून ही सभा अतीविराट होईल, असे दावे केले जात आहेत. त्याचवेळी विरोधकांकडून या सभेवरून शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या मनसे पक्षाकडून आता या सभेवरून आणि औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरून खोचक टीका करण्यात आली आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी औरंगजेबाची कबर नेस्तनाबूत करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी केली आहे.
“…पण एवढंच म्हणून कसं चालेल मुख्यमंत्री महोदय?”
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टीका करताना औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. “होय, हे संभाजीनगर आहे म्हणत बॅनरबाजी करायची. मी म्हणतोय ना संभाजीनगर? म्हणून सभेत घोषणा करायच्या. पण एवढंच म्हणून मुख्यमंत्री महोदय चालेल का? औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार आहे? या टोमणेसभेच्या दुसऱ्या अंकात आपण पेपर भिरकावणार आहात का की हा बघा केंद्राला प्रस्ताव पाठवला?” असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी नावं ठरली? ‘या’ दोन नेत्यांच्या नावांची चर्चा!
“दुसऱ्या अंकाची स्क्रिप्टसुद्धा बारामतीवरूनच”
“त्या औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत कधी होणार याची घोषणा संभाजीनगरच्या सभेत करणार का? की मागच्या टोमणेसभेप्रमाणे सभेच्या या दुसऱ्या अंकाच्या भाषणाची स्क्रिप्ट सुद्धा बारामतीवरुन येणार आहे? हा समस्त महाराष्ट्र आणि देशाला पडलेला प्रश्न आहे”, अशा खोचक शब्दांत मनसेकडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.