महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं असताना सत्ताधारी पक्षातील आमदार-खासदारांनीही यावरून नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालेलं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर दावा केला आहे. “कन्नड वेदिका संघटनेनं महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. यावरून मनसेनं आता संजय राऊतांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, ठाकरे गटावरही टीकास्र सोडलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
गुरुवारी संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी आपल्यावर हल्ला करण्याची धमकी कन्नड वेदिका संघटनेनं दिल्याचा दावाही त्यांनी केला. “कन्नड वेदिका संघटनेने महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली. हा माझ्यावरील हल्ला नसेल, हा महाराष्ट्रावरील हल्ला असेल. यावर भाजपा काही बोलणार आहे की थंडपणे पाहणार आहे? शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडच्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू म्हणतात, यावर भाजपाने बोलावं”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावरून आता मनसेनं संजय राऊतांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. “सौ दाऊद ज्यांना घाबरतात, त्यांना धमकी आल्याचं कळतंय. काळजी नका करू. सरकार संरक्षण देईलच. पण जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना महाराष्ट्रसैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील”, असं गजानन काळेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
“यांना खरंच धमकी…”
या ट्वीटमध्ये गजानन काळेंनी संजय राऊतांना खरच धमकी आली आहे की नाही, यासंदर्भात शंका उपस्थित केली आहे. “चर्चेत राहण्यासाठी अशा काड्या पिकवू नका. खरंच यांना धमकी आली आहे का हे सरकारने पहावे”, अशी मागणी काळेंनी ट्वीटमधून केली आहे.
दरम्यान, एकीकडे राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकारण सुरू असताना दिल्लीत यासंदर्भात खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. त्यामुळे आता केंद्राच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.