राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात विविध ठिकाणी पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेकडून थेट अजित पवार यांनाच लक्ष्य करण्यात आलं आहे. तसेच, अजित पवारांनी धारण केलेल्या मौनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं गुवाहाटीला जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवावं, असा खोचक सल्लाही मनसेनं दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर टीका करताना शिवीगाळ केल्याचं समोर आल्यानंतर त्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुप्रिया सुळेंनी केलेल्या ‘खोके सरकार’ टीकेला प्रत्युत्तर देताना “इतकी भि***झाली असेल सुप्रिया सुळे, तर तिलाही देऊ”, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी खालच्या पातळीची टीका केली. यावरून राजकारण रंगलं असताना त्यावरून मनसेनं थेट अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

“दया, कुछ तो गडबड है”

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी अजित पवारांनी सोयीस्कर मौन बाळगल्याची टीका केली आहे. “महाराष्ट्रासमोर इतके प्रश्न आ वासून उभे आहेत. पण महाराष्ट्राचे शॅडो सीएम ज्यांना म्हटलं जातं, ते विरोधी पक्षनेते अजित पवार शांत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकं की राष्ट्रवादीच्या मंथन शिबिरात प्रकृती बरी नसतानाही शरद पवार उपस्थिती लावतात, पण काही वैयक्तिक कारण सांगून अजित पवार अनुपस्थित राहतात. दया, कुछ तो गडबड है. एवढं मात्र नक्की”, असं गजानन काळे म्हणाले.

“अब्दुल सत्तार चुकीचंच बोलले, पण…”, सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

“गुवाहाटीला जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवा”

दरम्यान, अजित पवार शांत असून राष्ट्रवादी काँग्रेसने गुवाहाटीला जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवावं, असं गजानन काळे आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाले आहेत. “काल अब्दुल सत्तार सारखा एक मंत्री सुप्रिया सुळेंबाबत शिवराळ भाषेत बोलतो, संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचा निषेध केला जातो. पण विरोधी पक्षनेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याची साधी प्रतिक्रिया दिसत नाही. कुठल्या माध्यमांकडेही अजित पवारांनी निषेध नोंदवल्याचं दिसत नाही. गुवाहाटीला जाणाऱ्या मार्गाकडे राष्ट्रवादीनं आता लक्ष ठेवावं एवढं नक्की”, असं काळे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns gajanan kale targets ajit pawar on abdul sattar supriya sule controversy pmw