राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका सुरू असतानाच, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
“करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा, कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं. त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिणाऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?” असा सवाल मनेसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे शिवेसेना नेते संजय राऊत यांना उद्देशून केला आहे.
वर्ष २०२० मध्ये करोना महामारीच्या संकटामुळे राज्याचे अर्थचक्र बिघडलेलं असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील ‘वाईन शॉप्स’ सुरु करायला काय हरकत आहे? असा सवाल केला होता. शिवाय, राज यांनी उद्धव यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्याचे अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील काही मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये त्यांनी हॉटेलबरोबरच ‘वाईन शॉप्स’ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विचार करावा असं म्हटलं होतं.
“पार खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान ‘वाईन शॉप्स’ सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे?,” असं राज यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं होतं. तसेच, ‘वाईन शॉप्स’तून मिळणारा महसूल हा मोठा आहे आणि आत्ता राज्याला त्याची नितांत गरज असल्याचेही राज यांनी या पत्रामध्ये म्हटलं होतं.
“महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा”; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला
यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखामधून राज ठाकरे यांच्या या मागणीवरून टिप्पणी केली होती. “वाईन, डाईन आणि फाईन… व्वा राज बाबू..” अशा मथळ्याखाली अग्रलेख आला होता. “राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रिला परवानगी देण्याच विचार करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले आहे. त्यांना या कामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर.” असं अग्रलेखाच्या वर राज ठाकरेंच्या फोटोसह म्हटलं गेलं होतं.