Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava 2025 Updates : राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात घणघाती भाषण केलं. औरंगजेबाची कबर, महापालिका निवडणुका, लाडकी बहीण योजना यांसह त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. दरम्यान बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचाही उल्लेख राज ठाकरेंनी केला.

डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची हत्या

९ डिसेंबर २०२४ या दिवशी संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. हिवाळी अधिवेशन आणि त्यानंतर नुकतंच पार पडलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन यांमध्ये हा विषय चर्चेला आला होता. तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटोही व्हायरल झाले. या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळून इतर सगळ्यांना अटक झाली. तसं वाल्मिक कराड हा या खंडणी प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचंही समोर आलं. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. बीडच्या विंड मिलच्या राजकारणातून ही हत्या झाली. या प्रकरणाचा उल्लेख राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर काय म्हणाले राज ठाकरे?

संतोष देशमुख यांना घाणेरड्या प्रकारे मारलं. किती घाणेरड्या प्रकारे मारावं. तुमच्या अंगात नसानसात एवढी क्रूरता असेल तर मी दाखवेन जागा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात- राज ठाकरे

राज ठाकरे पुढे म्हणाले संतोष देशमुख यांची हत्या विंड मिल, वीज प्रकल्पातून निर्माण होणारी राख याच्यामधून, मी ऐकलं होतं राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो. आमच्या बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात. विषय होता पैशांचा. देशमुखांनी विरोध केला. तिथे संतोष देशमुख नसते कोणी दुसरं असतं तर तेच केलं असतं. विषय होता, पैशांचा, खंडणीचा, आपण लेबल काय लावलं? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. त्यात वंजाऱ्यांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध, कशात गुंतून पडतोय. पण तुम्हाला गुंतवलंय जातं आहे. राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतात, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपल्याला जातीपातींमध्ये अडवकलं जातं आहे-राज ठाकरे

दिवसाला सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. लक्ष देऊ नका. रोजगाराकडे लक्ष देऊ नका. आपल्याला जातीपातीत अडकवलं. कोणी जातीचं भलं केलं नाही. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर इतकी वर्ष जास्तीत जास्त आमदार, मंत्री, मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? काय केलं या आमदारांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी. माझ्या मराठा समाजाला समजा आरक्षण मागावं लागत असेल तर एवढे आमदार, खासदार मुख्यमंत्री, मंत्री का निवडून दिले. त्यांनी काय केलं. जात जातीला कधीच सांभाळत नाही. फक्त मते घेण्यासाठी तुमचा वापर करतात असंही राज ठाकरे म्हणाले.