Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित केलं. महाराष्ट्रात मागच्या दोन ते अडीच वर्षात झालेल्या घडामोडी, राज ठाकरेंचं मशिदींवरच्या भोंग्यांविरूद्धचं आंदोलन. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा वैचारिक वारसा, महाविकास आघाडी सरकार या आणि अशा सगळ्या मुद्द्यांचा चौफेर समाचार राज ठाकरेंनी घेतला. तसंच उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनाही सल्ला दिला. तर भाजपालाही एक इशारा दिला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. माहिमच्या समुद्रात होणाऱ्या अतिक्रमाणावरही भाष्य केलं.
एकदा राज्य माझ्या हातात द्या सगळा महाराष्ट्र मी सुतासारखा सरळ करेन. कुणीही यावं आणि टपली मारून जावं हे चालणार नाही. आत्ता मी माहिमचं अतिक्रमण दाखवलं ते महाराष्ट्रातल्या मुस्लिम वर्गाला तरी मान्य आहे? कसला दर्गा आहे? कुणाची समाधी आहे माशाची का? असं राज ठाकरे ओरडले तेव्हा लोकांनी पेंग्विन असं उत्तर दिलं. राज्य, राज्यकर्ते जेव्हा दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतलेले असतात तेव्हा बाहेरचे लोक काय करतात ते तुम्हाला दाखवलं. माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे रामनवमी जोरात साजरी करा. ६ जूनला शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. मी रायगडावर जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी दक्ष राहा, सावध राहा. एप्रिलमध्ये माझ्या उरलेल्या दोन सभा होत्या त्या मी घेणार आहेत.
समुद्रात मकदुम बाबा दर्गा उभा केला आहे. माहिम पोलीस स्टेशन तिथे जवळ आहे. लक्षनाही. महापालिकेचे लोक फिरत असतात त्यांनी पाहिलं नाही. हे नवीन हाजी अली तयार करण्याचा प्रयत्न होतो आहे. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना, महापालिका आयुक्तांनी मी आजच सांगतो की महिन्याभरात कारवाई झाली नाही त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग काय व्हायचं ते होऊ देत असंही राज ठाकरे म्हणाले.
मी मध्यंतरी एका भागात गेलो होतो. मला तेव्हा समुद्रात लोक दिसले. मला काय आहे ते समजेना. मी एकाला सांगितलं जरा बघ काय आहे ते. त्यावेळी मला त्या माणसाने ड्रोन फिरतात ना त्यातून शूट करून माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या. प्रशासनाचं दुर्लक्ष झालं की काय होतं बघा. प्रशासनाकडे लक्ष नसलं की कसं होतं बघा. देशाची घटना मानणारा जो मुस्लिम आहेत त्यांनाही माझा प्रश्न आहे की आत्ता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला मान्य आहे का? असं म्हणत राज ठाकरेंनी एक व्हिडीओ दाखवला. मी हे दाखवण्यापूर्वी माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सगळ्यांनाच विनंती आहे की कारवाई होत नसेल तर महिन्याभराने काय होईल ते मी सांगतो. असं म्हणत राज ठाकरेंनी माहिममधला एक व्हिडीओ दाखवला.
सांगलीतल्या खेळाच्या मैदानावर कसं अतिक्रमण आहे त्याबद्दलचं पत्रच राज ठाकरेंनी वाचून दाखवलं. अफझल खानाची कबर आणि त्याभोवतीचं अतिक्रमण मुख्यमंत्र्यांनी हटवलं. आज मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगू इच्छितो तुम्हाला शिवसेना नाव मिळालं आहे. चिन्ह मिळालं आहे. गेल्या वर्षी भोंग्यांचं आंदोलन झालं त्यावेळी मनसेच्या १७ हजार लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घ्या. आता मशिदींवरचे भोंगे परत वाजू लागले आहेत. एक तर तुम्ही ते बंद करा किंवा मग आम्ही काय करतो आहे त्याकडे दुर्लक्ष करा आम्ही आमच्या पद्धतीने हे भोंगे बंद करू. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच सांगलीतल्या या गोष्टीकडे लक्ष द्या असंही राज ठाकरे म्हणाले.
मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम हवेत. त्यांनी पाकिस्तानात जाऊन सांगितलं की आमच्या शहरावर जो हल्ला झाला तो आम्ही विसरणार नाही. मला असे मुस्लिम लोक हवे आहेत. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. ज्या देशाने महाराष्ट्राचं प्रबोधन केलं त्या महाराष्ट्राचं प्रबोधन करायची वेळ आली. हिंद प्रांतावर कुणी राज्य केलं असेल तर मराठेशाहीने तो हा महाराष्ट्र आहे. तो आज चाचपडतोय, आज हे गेले, उद्या ते गेले, उद्या ते आले. कशाप्रकारचं राजकारण आज महाराष्ट्र बघतोय? नवे उद्योग येताना दिसत नाहीत. बेरोजगारी आ वासून उभी आहे. बेरोजगार, तरूण हे सरकारकडे बघतं आहे. सरकार कोर्टाकडे बघतं आहे. असं कोर्टाकडे पाहून सरकार चालत नाही. मला तर म्हणायचं आहे की आत्ताच विधानसभा निवडणुका लावा जे व्हायचं ते होऊन जाऊदेत. मुख्यमंत्री नवीन आहेत. करा नीट काम एवढंच माझं सांगणं आहे.
अलीबाबा आणि चाळीसजण जूनमध्ये गेले. त्यांना चोर म्हणणार नाही कारण ते चोर नाहीत. यांनाच कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली. कोव्हिडच्या काळात उद्धव कुणाला भेटायला तयार नव्हता. एक आमदार भेटायला गेला मुलाला घेऊन तर मुलाला बाहेर ठेवलं आणि आमदाराला भेट दिली. हे असं वागल्यावर २१ जूनला कळलं आपल्याला एकनाथ शिंदे सुरतला गेले. मग पुढे गुवाहाटीला गेले. महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच. मग गुवाहाटी, गोवा असा प्रवास करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. एकनाथ शिंदेंना एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रासाठी काम करा. उद्धव ठाकरे सभा घेतात तिथे उत्तर द्यायला सभा घेऊ नका. पेन्शनचा विषय अडकला आहे तो विषय मिटवा, शेतकऱ्यांचे विषय आहेत ते सगळे हातात घ्या. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भेटा सभा कशाला घेता? असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
अनेक गोष्टी तेव्हा झाल्या.. राजकारणात झाल्या. घरातून झाल्या. आज जर माननीय बाळासाहेब असते तर मागची दोन-अडीच वर्षे झालं ते होऊ दिलं असतं का? सहानुभूती मिळवण्यासाठी सगळीकडे फिरायचं याने हे केलं त्याने ते केलं. अरे तू का शेण खाल्लं? अडीच वर्षांपूर्वीची स्थिती आठवा. भाजपा आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. मतदानाचा अधिकार तुमचा आहे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. सगळ्या लोकांनी मतदान केल्यानंतर हे यांचा खेळ खेळत बसणार? निवडणूक संपल्यावर निकाल आले तेव्हा एकत्र निवडणूक लढवून, उद्धव ठाकरेने सांगितलं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मान्य केलं होतं. निवडणुकीत बोलला होतात? मला चार भिंतीत अमित शाह यांनी सांगितलं मग जाहीर का नाही केलं?
नारायण राणेंनी शिवसेनाच सोडली नसती. मी तुम्हाला प्रसंग सांगतो. राणे पक्ष सोडणार कळत होतं मी त्यांना फोन केला. ते म्हणाले जायचं नाही. मी त्यांना सांगितलं की बाळासाहेबांशी बोलतो त्यावेळी बाळासाहेबांना फोन केला ते मला म्हणाले की नारायण राणेला घेऊन ये. पाच मिनिटांनी फोन आला की नको आणूस मला तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलत होतं. मला राणेंना सांगावं लागलं की येऊ नका. मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या. लोकांनी बाहेर पडावं यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली. जी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली त्याचा शेवट हा असा झाला. मला त्यांच्या राजकारणाशी काहीही घेणंदेणं नाही. असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी एके दिवशी उद्धवसोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो. तिथे मी त्याला बसवलो. मी हे जे सांगतोय ते शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो आहे. मी उद्धवला बसवलं आणि विचारलं की तुला काय हवं आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझं काम काय? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नकोस. मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाही. मी विचारलं ठरलं ना?तो म्हणाला हो ठरलं. बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवलं त्यांना सांगितलं की सगळी समस्या सोडवली. आमच्या दोघांमध्ये आता काही वाद नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी मला मिठी मारली आणि म्हणाले उद्धवला बोलव. पाच मिनिटं तो आला नाही. बाळासाहेबांनी मला सांगितलं उद्धवला बोलव मी त्याला बोलावयाला गेलो तो तिथून निघून गेला होता. मला कारण नसताना त्रास दिला जात होता. मी बाहेर कसा पडेन यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या.
शिवसेनेचं धनुष्यबाण हे शिवधनुष्य होतं. ते बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही मला माहित होतं. एकाला झेपलं नाही दुसऱ्याला बघा आता झेपतं आहे का? आत्ताच त्यांच्या बाजूच्या लोकांनाही सांगतो माझं बोलणं झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका कारण नंतर मी जे काही बोलेन त्यामुळे तोंड लपवावं लागेल. सगळ्यांना तो महाबळेश्वरचा प्रसंग आठवतो. पण त्याआधीही अनेक गोष्टी घडल्या. हे मी सांगतोय कारण आत्ताची परिस्थिती तुम्हाला समजेल असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी राजकारण लहान असल्यापासून पाहात आलो. अनुभवत आलो. असंख्य लोकांनी शिवसेना उभी केली, अनेक लोकांच्या कष्टातून संघटना उभी केली. मी जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडलो आणि त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी इथे जेव्हा भाषण केलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं की माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेदेखील म्हटलं होतं की हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार. खड्ड्यात पक्ष घातल्यानंतर त्याचा वाटेकरी व्हायची माझी इच्छा नाही म्हणून मी पक्ष सोडतोय. आजची ही परिस्थिती पाहिल्यावर टेलिव्हिजन सीरिज असतात त्यात रिकॅप येतो. २००६ मध्ये जेव्हा मी पक्ष स्थापन केला तेव्हा तो याच शिवतीर्थावर केला. मात्र त्या भाषणात काय झालं कशामुळे झालं तो चिखल करायचा नव्हता आजही करायाचा नाही. मात्र काही गोष्टी पसरवल्या गेल्या. राज ठाकरेला शिवसेनापक्षप्रमुख पद हवं होतं. राजला मिळालं नाही म्हणून तो बाहेर पडला. माझ्या स्वप्नातही हा विचार आला नव्हता.
गेल्या दोन वर्षांपासून आपण महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा खेळ, बट्याबोळ सर्वच पाहतो आहे. हे सगळं राजकारण पाहात असताना मला वाईट वाटत होतं पण ज्यावेळेला शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं की तुझं की माझं तेव्हा वेदना होत होत्या. लहानपणापासून मी तो पक्ष पाहात आलो, तो पक्ष जगलो. मी दुसरीत होतो तेव्हा माझ्या शर्टवर वाघ असायचा
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो.. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. बऱ्याच काळानंतर बोलतो आहे. अनेकांनी काल विचारलं एवढे मोठे स्क्रिन कशासाठी लावले आहेत? म्हटलं भाषण संपल्यावर पठाण दाखवणार आहेत. काहीतरी उद्देश आहे म्हणूनच लावलेत ना? आज शिवतीर्थाचा कोपरा अन् कोपरा भरलेला दिसतो आहे. अनेकजण बोलले की हा संपलेला पक्ष आहे जरा बघा हा संपलेला पक्ष आहे का? जे बोलले त्यांची अवस्था काय झाली? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.
राज ठाकरेंच्या उपस्थितीत अभिनेते, अॅड गुरू, नाटक आणि सिनेमा विश्वातले कलाकार भरत दाभोळकर यांनी मनसेत प्रवेश केला. मला आज एवढी गर्दी पाहून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली असं भरत दाभोळकर यांनी म्हटलं आहे. तसंच एवढ्या मोठ्या गर्दीसमोर बोलणं आणि त्यांना मंत्रमुग्ध करणं हे फक्त राज ठाकरेच करू शकतात असंही ते म्हणाले.
अवधूत गुप्तेंकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं गाणं सादर. मनसेचं नवं गाणं त्यांनी लाइव्ह सादर केलं. राजसाहेब ठाकरे पाठिशी असताना डरायचंं नाही. प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा.. नवनिर्माण घडवूया.. मनसे.. असं तरूणाईला पसंत पडेल अशा प्रकारे हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे.
राज ठाकरेंच्या हातात जर शिवसेना या पक्षाची धुरा असती तर नारायण राणे बाहेर पडले नसते, एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते, चाळीस आमदार बाहेर पडले नसते, शिवसेनेचे खासदार बाहेर पडले नसते. आत्ता तुम्ही लोकांकडे जाऊन मतांचा जोगवा मागत आहात. तुमच्याकडे तुमच्या कर्तृत्त्वावर उभं केलेलं काय आहे असाही प्रश्न बाळा नांदगावकर यांनी विचारला आहे.
ज्या संजय राऊत यांना राज ठाकरेंनी मोठं केलं तो संजय राऊत राज ठाकरेंचा झाला नाही तो इतर कुणाचा काय होणार? असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता तर संजय राऊतने सांगितलं की मी पवारांचाच माणूस आहे आता तो काय तुम्हाला साथ देणार? असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे जे मनात आहेत ते बोलतात. एका बाजूला बाळासाहेबांविषयी बोलणारी आणि हिंदू देव-देवतांचा अपमान करणारी ताई चालते. दाऊदशी व्यवहार करणारे लोक चालतात. बाळासाहेब ठाकरेंना कोण बाळासाहेब हे विचारणारे चालतात. मात्र भाऊ राज ठाकरे चालत नाहीत असं बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.
बोलायचं झालं तर खूप विषय आहेत. त्या विषयांमध्ये राज ठाकरेच महाराष्ट्राला हवेत. आधीचं नेतृत्व कसं फेल्युअर गेलं. त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी त्यांनी कसं फसवलं आहे? मला अनेक प्रश्न पडले आहेत. जर राज ठाकरेंना आमच्या जुन्या पक्षाची धुरा दिली असती तर महाराष्ट्रात काय घडलं असतं विचार करा असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे राज ठाकरे हे प्रामाणिकपणे, अभ्यासपूर्ण आणि कुठल्याही विषयाचा फडशा पाडल्याशिवया बोलत नाहीत.
उद्धव ठाकरेंनी कायमच म्हणजेच बाळासाहेब ठाकरे असतानाही राज ठाकरेंच्या विरोधात षडयंत्र केलं. आमच्या पाठीत खंजीर खुपसला वगैरे राज ठाकरे कधीही म्हणाले नाहीत कारण त्यांच्याकडे कर्तृत्व आहे. उद्धव ठाकरेंनी अशी परिस्थिती निर्माण केली की राज ठाकरे पक्षाबाहेर पडले पाहिजेत. अशा पद्धतीचे राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवण्याची वेळ आली पाहिजे. आदित्य ठाकरे काय बोलले? मनसे संपलेला पक्ष आहे त्याबद्दल बोलणार नाही. आज त्या आदित्य ठाकरेंना सांगतो महाराष्ट्र सैनिक तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही असंही संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे.
अमित ठाकरे आजारी होते तेव्हा प्रत्येकी पाच कोटी देऊन मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही का? आता कशासाठी रडत आहात? जेव्हा स्व कर्तृत्त्वावर काही मिळालं नाही की रडायला येतं. खोके घेतले, मला सोडून गेले म्हणून रडावं लागतं असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १७ वर्षे झाली. आपण या १७ वर्षांमध्ये जे केलं? तर मागच्या २५ ते ३० वर्षात केलं नाही ते आपण केलं. आपण इतकी वर्षे संघर्ष केला. इतर पक्षांनी तो केला नाही. हार-जीत होत असते. तरीही मनसेचा कार्यकर्ता डगमगला नाही. राज ठाकरेंनी जे काही मिळवलं ते स्व कर्तृत्त्वावर मिळवलं. कुणाचा तरी मुलगा म्हणून मिळवलं नाही असं म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंनी टीका केली.
महाराष्ट्रात जे राजकारण चाललं आहे ते अत्यंत गलिच्छ राजकारण सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जर कुणी घेऊन चालले असतील तर ते राज ठाकरेच आहेत. ओरिजनल ठाकरे म्हणजे राज ठाकरेच असं मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. तसंच राज ठाकरे जो आदेश देतील त्याचं पालन करू असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
भाजपा आणि शिंदे गटाला आमची गरज पडू शकते. मनसेशी भाजपाने आणि एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी चांगले संबंध ठेवले आहेत असं मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. प्रकाश महाजन हे शिवाजी पार्क मैदानावर पोहचले आहेत. तसंच राज्याच्या विविध भागांमधून लोक तिथे पोहचत आहेत. राज ठाकरेंची भूमिका ही कायम हिंदुत्वाची राहिली आहे. सध्या आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात हिंदुत्वाचा वारसा सांगणारे बरेच लोक उभे राहिले आहे. मात्र शिवसेनेत मौलवी फतवे काढतात की यांच्या गर्दी करायची आहे. हे हिंदुत्वाचे वारसदार आहेत की इम्रान हाश्मीचे वारसदार आहेत? असा प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढी पाडव्यानिमित्त शिवतीर्थावर सभा होणार आहे. या सभेत राज ठाकरे काय बोलणार आणि कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सभास्थळी जोरदार तयारी केली जात आहे. असं असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली आहे. राज ठाकरेंच्या सभेच्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने आज मनसे-शिंदे गट युतीची घोषणा होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
आज शिवतीर्थावर आज शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात निनादणार पक्षाचं नवं स्फूर्तीगीत !
आज शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात निनादणार पक्षाचं नवं स्फूर्तीगीत ! #मनसे_पाडवामेळावा @MNSAmeyaKhopkar pic.twitter.com/kgdLD2bf3g
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 22, 2023