मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवली असून यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये अ‍ॅमेझॉनसोबतचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया मनसे नेते अखिल चित्रे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला आहे.

मनसेने सुरु केलेल्या मराठी भाषेच्या मोहिमेविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यानंतर दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोर्टाने राज ठाकरे आणि काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.  राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंना दिंडोशी न्यायालयाची नोटीस; अ‍ॅमेझॉनसोबतचा वाद चिघळला

यावेळी ते म्हणाले की, “मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे”.

पुढे ते म्हणाले की, “खटले दाखल करण्याचा प्रयोग त्यांनी सुरु केला आहे. १९ तारखेला माझ्याविरोधात केस टाकली होती. आता राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचं दुसाहस त्यांनी केलं आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. अशा फालतू नोटीसला आम्ही फार किंमत देत नाही. मराठीसाठी कोणत्याही केसेस अंगावर घेण्याची तयार आहोत हे अ‍ॅमेझॉनने लक्षात ठेवावं”.

काय आहे नेमका वाद –
अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.

विशेष म्हणजे मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.

Story img Loader