महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोडींचा एक व्हिडीओ शेअर करत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजूनही या ‘चमकोमॅन’वर भरोसा ठेवणार का? असा सवालही अमेय खोपकर यांनी विचारला आहे. त्यांनी फेसबुकवर ५ मिनिटांचा व्हिडीओ शेअर करत ही प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, दरवर्षी लाखो गणेशभक्त गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. लोकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय कोकणात जाता यावं, यासाठी सरकारकडून आधीच उपाय-योजना करण्यात येतात. राज्य सरकारने अलीकडेच कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासाठी टोलमाफीची घोषणा केली आहे. तसेच गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा केला आहे. असं असलं तरी यामध्ये त्यांना पूर्ण यश आलेलं दिसत नाही.

हेही वाचा- Ganesh Chaturthi 2023: गणेशभक्तांपुढे प्रवासविघ्न; मुंबई-गोवा महामार्गावर अडथळय़ांची शर्यत कायम

कारण आज (रविवार, १७ सप्टेंबर) मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे हजारो गाड्यांना वाहनांना रेंगाळत प्रवास करावा लागत आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर करत रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

“रवींद्र चव्हाण, धन्यवाद… तुमचा खोटारडेपणा आणि अकार्यक्षमतेमुळे आज मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल १० किमी पेक्षा जास्त लांब रांगा लागल्या आहेत”, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी रवींद्र चव्हाणांवर टीकास्र सोडलं आहे. “अजूनही तुम्ही या ‘चमकोमॅन’वर भरवसा ठेवणार का?” असा सवालही खोपकरांनी विचारला.