MNS VS NCP : राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात पूरस्थितीच्या भागाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केला होता. अमोल मिटकरींनी केलेली ही टीका मनसैनिकांच्या जिव्हारी लागली आणि अकोल्यातील मनसैनिकांनी मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. यानंतर मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी अमोल मिटकरींना इशारा दिला आहे. “पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार, राज ठाकरेंवर टीका केली तर कानाखाली आवाज निघणार”, असा इशारा खोपकर यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेय खोपकर काय म्हणाले?

“अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. मग हे अमोल मिटकरी कोण आहेत? त्यांची पात्रता काय आहे? अमोल मिटकरी घासलेट चोर आहेत. ते त्यांच्या गावात आधी घासलेट चोरायचे आणि विकायचे. मग राज ठाकरेंवर बोलायची त्यांची लायकी नाही. अजित पवार हे चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी टीका करणं वेगळं आहे”, असा हल्लाबोल अमेय खोपकर यांनी केला.

“जर टीका करायची असेल तर टीका करा. मात्र, खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं नाही. अन्यथा कानाखाली आवाजच निघेल. आता यापुढे मी सांगतो, जे कोणी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील लोक आहेत, त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली तर त्यांच्या कानाखाली आवाज निघणार. मग आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते दाखल करा. यापुढे आता अमोल मिटकरींनी त्यांचं थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार”, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद का रंगला?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असा उल्लेख केला होता. मिटकरी यांनी केलेलं हे विधान मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलं. यानंतर अकोल्यातील मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीची तोडफोड केली.

या प्रकरणात काही जणांना अटकही करण्यात आली. यानंतर अमोल मिटकरी यांनी या हल्ल्याला राज ठाकरे हे जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालं असून एक प्रकारे मनसे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा वाद रंगला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader ameya khopkar on ncp mla amol mitkari and mns vs ncp politics gkt