Uddhav Thackeray and Raj Thackeray Alliance : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझा इगो पाहत नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना युतीसाठी निमंत्रणच दिले. राज ठाकरेंच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनीही प्रतिक्रिया दिली असून युती केल्यानंतर कोणालाही लपून छपून भेटणार नसाल तर मीही हे भांडण विसरायला तयार आहे, असं त्यांनी जाहीर सभेत सांगितलं. दरम्यान, या युतीवरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महत्त्वाचे नेते अमेय खोपकर यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.

मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्या या प्रस्तावावर, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

या दोघांची वक्तव्य समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर यांनी सोशल मीडिया पोस्ट करून खळबळ उडवली आहे. “अशी अभद्र युती होऊ नयेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना”, असं म्हणत त्यांनी या युतीला विरोध दर्शवला आहे.

उद्धव ठाकरेंनी दोनवेळा धोका दिला

दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचा चर्चा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, “२०१४ मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसनेनेची युती तुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क केला, दोघे बोलले आणि एकत्र लढायचे ठरले. यावर आमच्याकडून बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अनिल देसाई चर्चा करतील असे ठरले होते. त्याच्यासाठी राज ठाकरे यांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते.

संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, “हे ठरल्यानंतर दोन दिवस उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई यांनी फोन उचलले नाही. अनिल देसाईंनी त्यांचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली तरीही मनसेने एबी फॉर्म थांबवून ठेवले होते. हे सांगायचा उद्देश असा की, आम्हाला शिवसेनेने २०१४ आणि २०१७ (मुंबई महापालिका निवडणूक) असा दोन वेळा धोका दिला.”