नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी बुधवारी म्हणजेच २९ जून २०२२ रोजी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. महाराष्ट्राच्या राजकारणामधील या महत्वाच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांना तिळमात्र सहानुभूती नसल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवरुन खोपकर यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नक्की वाचा >> “आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…”; उद्धव ठाकरेंसाठी दाक्षिणात्य अभिनेत्यानं केलेली पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
उद्धव ठाकरेंनी राजीनामा देत असल्याचं रात्री पावणेदहाच्या सुमारास जाहीर केलं. त्यानंतर ते स्वत: गाडी चालवत रात्री पावणेबाराच्या सुमारास राजभवनावर पोहोचले. याचदरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया नोंदवली. यामध्ये खोपकर यांनी, “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, राज ठाकरेंची माणसं फोडणाऱ्या, राज ठाकरेंबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही,” असं खोपकर यांनी म्हटलंय.
बहुमत चाचणीसाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बुधवारी फोन करुन पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. त्यावर राज यांनी भाजपाच्या बाजूने मनसेचा आमदार मतदान करेल असं फडणवीसांना सांगितलं होतं. मात्र बहुमत चाचणीच्या आधीच उद्धव यांनी राजीनामा दिला.
शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपच्या पत्रानुसार राज्यपालांनी बुधवारी ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोडय़ाच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजीनामा सादर करण्यासाठी राजभवन गाठले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काही शिवसेना आमदारांसह सूरत गाठत बंड केले. त्यानंतर शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बहुतांश आमदार गुवाहाटीला गेले आणि दिवसागणिक बंडखोर आमदारांची संख्या वाढत राहिली. शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदार आणि काही अपक्ष आमदार शिंदेगटात दाखल झाल्याने महाविकास आघाडी सरकार संकटात आले. ‘परत या, चर्चा करून तोडगा काढू’ अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातली. पण, शिंदे गटाने त्यास दाद दिली नाही.