राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) २५ किल्ल्यांची यादी करण्यात आली असून हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी सरकारने किल्ले हॉटेल व्यवसायिंकाना देण्याचा निर्णय घेतल्याने विरोधक चांगलेच खवळले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीका करतानाच शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात न लावण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मिडियावरुन सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतल्याने खोपकर यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना टोला लगावला आहे. किल्ल्यांवर हॉटेल, रिसॉर्ट बांधून हे किल्ले लग्न समारंभ आणि कार्यक्रमांसाठी देण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर हाच मुद्दा पकडून खोपरकर यांनी एक ट्विट केले आहे. ‘लग्न लावायला गड कशाला हवेत? वर्षा बंगलाही पुरेसा आहे,’ असा टोला खोपकर यांनी ट्विटवरुन लगावला आहे. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर लग्न लावण्याऐवजी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या मुंबईमधील मलबार हिल्स येथील वर्षा या निवासस्थानी लग्न लावावीत असे खोपकर यांना या ट्विटमधून सुचवायचे आहे.

दरम्यान, गडकिल्ल्यांना भाडेतत्वावर देण्याची बातमी समोर आल्यानंतर सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ‘शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना हात लावला जाणार नाही. राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येण्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र महाराजांच्या किल्ल्यांसंदर्भात कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. तसेच किल्ल्यांवर लग्न लावणे, कार्यक्रम करणे असे प्रकार होणार नाहीत,’ अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader ameya khopkar slams cm fadanvis over heritage resorts on forts scsg