महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील पोलिसांना सरकारने बोनस जाहीर करावा अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे. हे पत्र मनसेच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; शरद पवारांसमोर भाषण करताना मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सदैव सतर्क आणि कार्यरत राहून महाराष्ट्रातील जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांना दिवाळी निमित्त सरकारने बोनस जाहीर करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी केली आहे,” अशा कॅप्शनसहीत मनसेनं हे पत्र ट्वीट केलं आहे. २० ऑक्टोबर रोजी लिहिण्यात आलेल्या या पत्रामध्ये पोलिसांच्या कार्याचा उल्लेख अमित ठाकरेंनी केला आहे.

“महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह राज्यातील सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसेच मित्रमंडळींसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात, ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे, अतिमहत्तवाची शासकीय सेवा नोकरी म्हणून पोलीस बांधव ना युनियन करु शकतात, ना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो, ना त्यांना पुरेशा सुट्ट्या मिळतात. कामाचे तास तर सर्वात जास्त. १२ ते १५ तास! पोलीस बांधवांच्याच म्हणण्यानुसार, इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा त्यांना एका वर्षात तब्बल ७६ दिवस अतिरिक्त काम करावे लागते,” असं अमित ठाकरेंनी पत्राच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; CM शिंदेंच्या बाजूला बसून पवारांचं विधान; फडणवीस भन्नाट उत्तर देत म्हणाले, “सासरच्या माणसांना…”

“हे सगळं आज सांगण्याचं कारण इतकंच की, पुढच्या आठवड्यात दिवाळी साजरी करताना आपल्या प्रत्येकाच्या घरात जेव्हा कंदील आणि पणत्या लागतील तेव्हा पोलीस बांधव डोळ्यात तेल घालून गस्त देत असतील. फटाके वाजवताना कुठे कुणी लहान मुलगा भाजला तर त्याला रुग्णालयात दाखल करत असतील. पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल. हे एक समाज म्हणून आपण विसरूनच गेलोय,” अशी खंत अमित ठाकरेंनी व्यक्त केली.

नक्की वाचा >> तत्काळ चौकशी करा! CM शिंदेंचे आदेश; रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय?

“माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी,” असं अमित यांनी म्हटलं आहे.

आता अमित ठाकरेंच्या या पत्रावर देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरीमधील पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची विनंती केली होती. दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा यांना बिनविरोध निवडूण द्यावं अशी विनंती राज यांनी केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच भाजपाने मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतरही राज यांनी फडणवीस यांच्याप्रती आभार व्यक्त करणारं पत्र लिहिलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader amit thackeray letter to devendra fadnavis ask to give diwali bonus to police scsg