दादारमधील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर वांद्रे-कुर्ला संकुलामधील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी पार पडला. या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केली होती. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका करण्यात आल्याचं चित्र प्रमुख नेत्यांच्या भाषणात पहायला मिळालं. मात्र, या दोन्हींपैकी कोणाचा दसरा मेळावा पाहिला यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी सोलापूर येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा पाहिला, असे विचारले. त्यावर “कोणाचाच दसरा मेळावा पाहिला नाही,” असे उत्तर अमित ठाकरे यांनी दिलं.
हेही वाचा –
“गणोशोत्सव, नवरात्रीमुळे थांबलेला मनसे विद्यार्थी सेनेचा पुनर्बांधणी दौरा पुन्हा सुरु करण्यात आला आहे. ज्या तरुणांना विद्यार्थी सेनेत काम करायचं आहे, त्यांना भेटणार आहोत. मग, या दौऱ्याचा अहवाल मनसेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटून राज ठाकरेंना दिला जाणार,” असेही अमित ठाकरे यांनी सांगितलं.