Shiv Sena Thackeray Group Vs MNS : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रात्री नारळ फेकत हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अंधाराचा फायदा घेऊन काही तरी फेकलं, अशा चुटपूट घटनामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही, असं त्यांनी म्हटलं. यानंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाला इशारा दिला आहे. “आज ठाण्याने तुमची वाट पाहिली. मात्र, यापुढे संपू्र्ण महाराष्ट्रात मनसैनिक तुमची वाट पाहत आहेत. संजय राऊत जर आम्हाला आव्हान देत असतील तर आम्ही त्यांना सांगतो की, वेळ आणि टाईम तुमचा मग आम्ही तुम्ही सांगाल तिथे येणार”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

हेही वाचा : Eknath Shinde : “अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया!

अविनाश जाधव काय म्हणाले?

“ठाकरे गटाने आता आमच्यावर टीका केली असेल. मात्र, आम्ही काल दिवसभर वाट पाहत होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट पाहिली तेव्हा ते आले. ते घेरातून बाहेरही पडत नव्हते. तुम्ही जर राज ठाकरे यांच्या अंगावर येत असाल तर आम्हीही तुमच्या अंगावर येणार. शिवसेना ठाकरे गटाला आम्ही सांगतो की, काल ठाण्याने तुमची वाट पाहिली. मात्र, यापुढे जर तुम्ही असं केलं तर संपू्र्ण महाराष्ट्रात मनसैनिक तुमची वाट पाहतील”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.

“राज ठाकरे यांच्या गाडीवर बीडमध्ये हल्ला करून मर्दानगी केली असं तुम्हाला वाटत असेल तर माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते राज ठाकरेंसाठी जीव देयलाही तयार आहेत. आमच्या नादाला लागू नका. तुमच्या सभा बैठका काय घ्यायचं ते घ्या. पण आमच्या अंगावर आलात तर आम्ही तुमच्या अंगावर येणार म्हणजे येणार. ठाकरे गटाने अशाच प्रकारे सुरु ठेवलं तर आम्हीही आमचं आंदोलन असंच सुरु ठेवणार आहोत. त्यामुळे ठाकरे गटाने हा विषय वाढवायचा की विषयावर पाणी टाकायचं हे ठरवावं”, असंही अविनाश जाधव म्हणाले.

संजय राऊतांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना जाधव म्हणाले, “त्यांनी आम्हाला आव्हान देऊ नये. पण जर ते आव्हान देत असतील तर आम्ही त्यांना सांगतो की, वेळ तुमची, मग तुम्ही सांगाल तेथे आम्ही येणार म्हणजे येणार”, असं अविनाश जाधव म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दालीचे लोक होते. दिल्लीच्या अब्दालीने महाराष्ट्रात मोठी सुपारी दिली आहे. त्यापैकीच ही एक सुपारी होती. बीडमध्ये मनसेच्याबाबतीत जो प्रकार घडला, त्याच्याशी ठाकरे गटाचा संबंध नव्हता, हे आम्ही कालच स्पष्ट केलं होतं. मात्र, तरीही अॅक्शनला रिअॅक्शन होती, असं कुणी म्हणत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. काल ठाण्यात अंधाराचा फायदा घेऊन उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर काही वस्तू फेकण्यात आल्या. मात्र, अंधार असल्यामुळे फेकणारे वाचले. जर ते मर्द असते, तर त्यांनी समोर येऊन हल्ला केला असता”, असं संजय राऊत म्हणाले होते.

नेमकं काय घडलं होतं?

बीडमध्ये शिवसेना उद्ध‌व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या वाहनासमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. यानंतर शनिवारी रात्री भगवा सप्ताह निमित्ताने उद्धव ठाकरे हे ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे येत जात असताना त्यांचा ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळफेक केली. या घटनेत ताफ्यातील काही वाहनाच्या काचा फुटल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader avinash jadhav on shiv sena thackeray group uddhav thackeray sanjay raut and shiv sena vs mns gkt