राज्यात मुंबई महानगर पालिकेसोबतच इतर काही महानगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मुंबईत झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली असून मनसैनिकांनी युतीच्या चर्चेत पडू नये, असं आवाहन राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं असताना या बैठकीनंतर युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. युतीच्या चर्चांविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता बाळा नांदगावकर यांनी यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
“सर्वांसाठीच चर्चेचे दरवाजे खुले”
युतीसंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता युतीच्या चर्चांना पूर्णविराम म्हणण्याचा आत्ता विषय नाही, असं नांदगावकर म्हणाले. “पूर्णविराम बोलण्याचा विषय नाही. आत्तापर्यंत आम्ही कुणासोबत निवडणुका लढवलेल्या नाहीत. आमच्या कुणाशी चर्चा झालेल्या नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या निवडणुका लढवणार आहोत. पक्षाचे नेते म्हणून राज ठाकरे जी भूमिका मांडतात तीच आमची असते”, असं नांदगावकर म्हणाले.
“जर समोरचे कुणी काही बोलायला आले, तर चर्चेचे दरवाजे सगळ्यांसाठीच खुले ठेवावेच लागतात”, असं म्हणून बाळा नांदगावकर यांनी अजूनही युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावलेली नाही.
“निवडणुकीच्या तयारीला लागा”; स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश!
भाजपानं युतीसाठी हात पुढे केला तर?
“युतीबाबत बोलायचं तर तो वरिष्ठांचा निर्णय असतो. त्याविषयी भविष्यात जो काही निर्णय घ्यायचा असतो, तो राज ठाकरेच घेतील. दुसरं कुणी घेऊ शकत नाही. सर्व महानगर पालिकांमध्ये स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणुका लढवण्याची आम्ही तयारी करत आहोत. भाजपानं युतीसाठी हात पुढे केला तर काय हा नंतरचा विषय आहे”, असं देखील बाळा नांदगावकर यांनी नमूद केलं.